Raj Thackeray on Yasmin Shaikh death : मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचं निधन झालं. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फेसबुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय, मराठी भाषेसाठी यास्मिन शेख यांनी मराठी भाषेसाठी कशाप्रकारे काम केलं..याबाबतही राज ठाकरेंनी सविस्तर लिहिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : 30 वर्षीय गर्भवती महिलेवर भावासह काकाकडून अत्याचार, प्रायव्हेट पार्टचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी
ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि मराठी व्याकरणाच्या अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचं निधन झालं. यास्मिन बाई या जन्माने ज्यू आणि कर्माने अस्सल मराठी होत्या.
यास्मिनबाईंसारख्या व्यक्तींबद्दल मला कमालीचं कुतूहल आणि आदर आहे. ते फक्त त्या ज्यू आणि तरीही मराठी भाषेसाठी आयुष्य वाहिलं म्हणून नाही. पण एखादी भाषा आणि तिचा आत्मा टिकून रहावा या आग्रहासाठी संपूर्ण आयुष्य देणं हे विलक्षण आहे आणि आजच्या काळात अद्भूत आहे.
जन्माने ज्यू असलेल्या जेरुशा रुबेन यांनी अझीझ शेख यांच्याशी विवाह केला आणि त्या यास्मिन शेख झाल्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या आणि मुस्लिम व्यक्तीशी संसार केलेल्या या विदुषीने आपलं आयुष्य मात्र मराठी भाषेच्या अभ्यासासाठी आणि तिच्या शुद्धतेसाठी वाहून घेतलं. खरंतर महाराष्ट्र म्हणजे काय आणि मराठीपण म्हणजे काय, याचं उत्तर त्यांच्या या आयुष्याच्या प्रवासातच दडलेलं आहे. मराठीपण ही जन्माने मिळणारी मक्तेदारी नाही; मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी असलेल्या निष्ठेतून ती कमवावी लागते. आणि आजच्या काळात आपण आपल्या भाषेला ज्या पद्धतीने गृहीत धरतोय त्यावरून तर मी अगदी ठामपणे म्हणेन की आपल्याला आपली भाषा टिकवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी सगळ्यांना कष्ट करावेच लागतील. असो
यास्मिनबाई ज्या काळात घडल्या, त्या काळात भाषा शुद्ध लिहिणं, योग्य उच्चारण करणं आणि व्याकरणाचे नियम पाळणं याला एक शिस्त होती आणि ती पाळणाऱ्यांबद्दल आदर होता. आज संवादाची साधनं अफाट वाढली, प्रत्येकाच्या हातात लिहिण्याचं माध्यम आलं; पण दुर्दैवाने भाषेबद्दलचा तो काटेकोरपणा मात्र कमी होत गेला. 'अर्थ समजला ना, मग झालं' इतक्यावर भाषा चालत नाही. भाषा ही एका संस्कृतीची स्मृती असते आणि म्हणूनच तिची काळजी घ्यावी लागते.
विशेष म्हणजे यास्मिनबाईंचा आग्रह भाषा आहे तशीच राहिली पाहिजे, तिच्यात नवे प्रवाह नवे शब्द येऊ नयेत असा कधीच नव्हता. भाषा बदलणार, नवी भाषा नवे शब्द स्वीकारणार हे त्यांना मान्य होतं; पण तो बदल विचारपूर्वक व्हावा, भाषेचा मूळ बाज आणि तिची रचना टिकावी , ती बिघडू नये हा त्यांचा आग्रह होता.
भाषा ही प्रवाही असते. ती इतर भाषांमधले शब्द स्वीकारणार, काळानुसार बदलणार आणि तिची नवी रूपंही तयार होणार. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. पण भाषा बदलणं आणि भाषेवरचं प्रभुत्व गमावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बोलीभाषा कितीही समृद्ध होत राहोत, पण त्या भाषेची एक प्रमाणभाषा टिकली पाहिजे आणि विशेषतः ज्यांची ती मातृभाषा आहे, त्यांना ती उत्तम बोलता, वाचता आणि लिहिता आली पाहिजे. प्रमाणभाषेचा आग्रह हा भाषेच्या शुद्धतेचा अट्टहास नसतो; तो त्या भाषेच्या अभिव्यक्तीची ताकद टिकवण्याचा आग्रह असतो. हा आग्रह धरणाऱ्या शेवटच्या दुव्यांपैकी यास्मिनबाई एक.
त्यांच्या जाण्याने केवळ एक व्याकरणतज्ज्ञ गेल्या असं नाही, तर भाषेवर प्रेम करणं म्हणजे तिच्याशी काटेकोर राहणं असं मानणाऱ्या एका पिढीचा आणखी एक दुवा निखळला. यास्मिन शेख यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.
ADVERTISEMENT












