मुंबईच्या दोन डॉक्टरांचा पाकिस्तानला पुळका, 'गुपित' कनेक्शनची भन्नाट कहाणी!

रोहित गोळे

• 06:26 PM • 21 Aug 2026

मोहम्मद अली जिन्ना यांचं एक खास गुपित जपणाऱ्या मुंबईतील दोन दिवंगत डॉक्टरांना तब्बल 79 वर्षानंतर पाकिस्तानने ‘निशान-ए-इम्तियाज’ जाहीर केला आहे. जाणून घ्या नेमकं काय आहे हे गुपित.

mumbai two doctors pakistan nishan e imtiaz jinnah secret connection

मुंबईच्या दोन डॉक्टरांचा पाकिस्तानला पुळका,

Google CTA

“कुछ राज़ वक़्त की गर्दिश में दफ़्न हो जाते हैं,
मगर कुछ राज़ मुल्कों की तक़दीर बदल जाते हैं…”

हे वाचलं का?

1947 साली भारत स्वतंत्र होत असताना एक असा प्रश्न इतिहासाच्या उंबरठ्यावर उभा होता, ज्याचं उत्तर कदाचित संपूर्ण आशिया खंडाचा नकाशाच बदलू शकत होता.

मोहम्मद अली जिन्नांबद्दलची एक गोष्ट जर त्यावेळी ब्रिटिश सरकारला कळली असती तर आज आपल्याला पाकिस्तान दिसलाच नसता...

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची चर्चा आज अचानक का होतेय? तर त्याचं कारणही तितकंच रंजक आहे. आणि ते थेट जोडलं पाकिस्तानशी. कारण अवघ्या आठवडाभरापूर्वी पाकिस्तानमध्ये एक अशी घोषणा झाली, ज्यामुळे 1947 मधलं हे गूढ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. आणि या संपूर्ण इतिहासाच्या मध्यभागी आहेत मुंबईचे दोन दिवंगत डॉक्टर...

जवळपास आठ दशकांनंतर पाकिस्तानने भारतातील दोन दिवंगत डॉक्टरांना आपल्या प्रतिष्ठेच्या दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला ‘निशान-ए-इम्तियाज’जाहीर केला आहे

तो म्हणजे एक फिजिशियन — डॉ. जल रतनजी पटेल आणि दुसरे डॉक्टर जल धायभो-कू यांना...

पण प्रश्न असा आहे की, भारताच्या या दोन दिवंगत डॉक्टरांबाबत पाकिस्तानला अचानक प्रेमाचं एवढं भरतं का आलं? म्हणजे तब्बल 79 वर्षांनंतर त्यांना इतका मोठा सन्मान देण्यामागचं नेमकं कारण काय? खरं तर, या सन्मानामागे केवळ डॉक्टर म्हणून त्यांनी केलेली सेवा नाही, तर एक असं गुपित आहे, ज्याचा धागा थेट मोहम्मद अली जिन्नांपर्यंत पोहोचतो. आणि हे गुपित जितकं धक्कादायक आहे तितकंच रंजकही.

चला, जाणून घेऊया एका अशा ऐतिहासिक गुपिताची कहाणी... ज्याचा संबंध थेट मुंबई, जिन्ना आणि 1947 च्या फाळणीशी आहे.

पाकिस्तानने नुकतीच आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागरी आणि लष्करी पुरस्कारांची घोषणा केली. याच घोषणेनंतर पाकिस्तानचे नियोजनमंत्री अहसान इक्बाल यांनी ‘X’वरील पोस्टमधून दोन नावांची माहिती दिली.

ही दोन नावं होती डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल धायभो-कू. दोघेही मुंबईतील पारसी समुदायातील डॉक्टर. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही डॉक्टरांनी मोहम्मद अली जिन्ना यांच्या गंभीर आजाराची माहिती अत्यंत प्रामाणिकपणे आणि व्यावसायिक गोपनीयता पाळून गुप्त ठेवलेली. आणि याचीच परतफेड म्हणून पाकिस्तान आता त्यांना ‘निशान-ए-इम्तियाज’ बहाल करतोय.

मंत्री इक्बाल यांनी या घटनेचं महत्त्व सांगताना एक अत्यंत मोठा दावा केलाय. त्यांच्या मते, जिन्नांच्या प्रकृतीची गंभीरता जर त्यावेळी समोर आली असती, तर 1947 मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीलाच खीळ बसली असती.

पण ही सगळी कहाणी जाणून घेण्यासाठी आपल्याला 1946-47 चा काळ आधी समजून घ्यावा लागेल..

मोहम्मद अली जिन्ना... हे मुस्लिम लीगचे प्रमुख नेते होते. तसंच स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीचा सर्वात प्रमुख चेहराही. पण याच काळात जिन्नांच्या शरीरात एक गंभीर आजार वाढत होता. क्षयरोग म्हणजेच टीबी.

उपलब्ध माहितीनुसार, त्या काळात जिन्नांची प्रकृती अत्यंत खालावली होती. डॉ. जल रतनजी पटेल त्यांच्यावर उपचार करत होते. जिन्नांना त्यांच्या आजाराची गंभीरता माहिती होती. आणि या आजाराची माहिती जर ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना, विशेषतः भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांना मिळाली तर वेगळ्या देशाचं स्वप्न भंगेल ही भीती जिन्नांना होती.

कारण त्या काळात पाकिस्तानच्या निर्मितीची चर्चा निर्णायक टप्प्यावर पोहोचली होती. जिन्नांची मागणी स्पष्ट होती 'फाळणी लवकर करा आणि आम्हाला स्वतंत्र पाकिस्तान द्या...'

जिन्नांच्या या घाईमागचं खरं कारण होतं ते म्हणजे त्यांचा गंभीर आजार.. अशावेळी मुंबईतील ते दोन डॉक्टर हे जिन्नांसाठी जणू देवदूतच ठरलेले.

आता इथे या कहाणीचा सर्वात महत्त्वाचा भाग येतो. कारण जिन्नांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर एक नैतिक प्रश्न होता. तो म्हणजे एका बाजूला त्यांचा रुग्ण आणि दुसऱ्या बाजूला त्या रुग्णाचा राजकीय प्रभाव.

पण डॉक्टरांसाठी रुग्णाची वैद्यकीय माहिती ही गोपनीय असते. अशावेळी डॉ. जल पटेल यांनी आपली व्यावसायिक शपथ पाळली. त्यांनी जिन्नांच्या आजाराची तसूभरही माहिती बाहेर जाऊ दिली नाही.

जिन्नांनीही याच गोपनीयतेवर भर दिला होता. कारण त्यांना माहीत होतं जर त्यांच्या आजाराची खरी माहिती बाहेर पडली असती तर त्याचा पाकिस्तानच्या मागणीवर परिणाम झाला असता.

म्हणजे कल्पना करा...

एका डॉक्टरकडे असा मेडिकल रिपोर्ट आहे, जो सार्वजनिक झाला असता तर त्याचा परिणाम केवळ एका व्यक्तीच्या आयुष्यावर नाही, तर लाखो-करोडो लोकांच्या भविष्यावर झाला असता.

पण डॉक्टरांनी तो रिपोर्ट गुप्त ठेवला. कारण तो काही राजकीय दस्ताऐवज नव्हता. तर तो एका रुग्णाचा मेडिकल रिपोर्ट होता.

आता आपण पोहोचतो या संपूर्ण कहाणीतील सर्वात मोठ्या घडामोडीकडे...

भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते लॉर्ड माऊंटबॅटन. आणि त्यांच्यासमोर प्रश्न होता भारताच्या स्वातंत्र्याचा आणि फाळणीचाही..

पण समजा... फाळणीची चर्चा होण्याआधीच माऊंटबॅटनना जर हे समजलं असतं की, जिन्ना काही महिन्यांचेच पाहुणे आहेत. तर कदाचित त्यांनी फाळणीच्या निर्णयाला निश्चितच विलंब केला असता. किमान काही काळासाठी तरी.

पण हा दावा कितपत खरा आहे हे आपल्याला ‘फ्रीडम अॅट मिडनाईट' या ऐतिहासिक पुस्तकातून समजून घ्यावं लागेल.

हो... हे तेच पुस्तक आहे.. ज्यावर नुकतीच एक वेबसीरिज देखील आलीय. लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपिएर या जोडगोळीने लिहिलेलं हे प्रसिद्ध पुस्तक आहे. 

भारताची फाळणी आणि स्वातंत्र्य याचा मागोवा घेण्यासाठी या लेखकांनी अनेक वर्षे संशोधन केलं. आणि या संशोधनात त्यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या अनेक भेटी घेतलेल्या.

माऊंटबॅटन यांच्याकडे त्या काळातील घटनांची थेट माहिती होती. याच मुलाखतीच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक कथन समोर येतं.

लेखकांनी जेव्हा माऊंटबॅटन यांना जिन्नांच्या आजाराबद्दल नेमकी माहिती दिली. तेव्हा माऊंटबॅटन यांची प्रतिक्रिया होती  “ओ माय गॉड!”

कारण त्यांना जर जिन्नांची प्रकृती एवढी गंभीर असल्याचं आधी माहिती असतं... तर फाळणीबाबतचा त्यांचा निर्णय कदाचित वेगळा झाला असता, असं या पुस्तकातून सूचित होतं.

यावेळी माऊंटबॅटन यांनी असंही म्हटलं की..  "मोहम्मद अली जिना यांना क्षयरोग झाला आहे आणि ते काही दिवसांचे पाहुणे आहेत हे फाळणीच्या आधी कळलं असतं तर मी निश्चितच भारताच्या अखंडतेवर ठाम राहिलो असतो आणि आजचा इतिहासच वेगळा असता. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी काही महिने आणखी लागले असते. परंतु हिंदुस्तानची फाळणी टळली असती. पाकिस्तान अस्तित्वातच आला नसता. भारत अखंड राहिला असता आणि तीन युद्धेही झाली नसती…"

'फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकाच्या लेखकांना दिलेल्या मुलाखतीतील हे उद्गार लॉर्ड माऊंटबॅटन यांचे आहेत.'

स्वतंत्र पाकिस्तानची चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा 'शक्य तेवढ्या लवकर फाळणीचा निर्णय घ्यावा', असा रेटा जिना यांनी माऊंटबॅटन यांच्याकडे लावला होता. आपल्याला क्षयरोग आहे हे माऊंटबॅटन, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना माहिती झालं तर पाकिस्तानची निर्मिती होणारच नाही, हे जिन्नांना पक्कं ठाऊक होतं. त्यामुळेच ते फाळणीची घाई करीत होते.

लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताला स्वातंत्र्य देताना चार तत्कालीन महान नेत्यांशी अनेकदा चर्चा केलेली. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यासोबत चर्चेच्या अनेक फैरी पार पडल्या होत्या. या चौघांपैकी जिन्ना वगळता तिघेही सतत हेच म्हणत होते की, 'भारताला स्वातंत्र्य मिळावे, पण एकसंध आणि अखंड भारत म्हणूनच..',

'मात्र मुस्लिम लीगचे नेते असलेले जिन्ना हे एकमेव नेते होते ज्यांना मुस्लिम राष्ट्र म्हणून स्वतंत्र पाकिस्तान हवा होता. 10 एप्रिल 1947 रोजी माऊंटबॅटन आणि जिन्ना यांची शेवटची चर्चा झालेली. माऊंटबॅटन यांनी जिन्नांना हे निक्षून सांगितलेलं की, "जो वेगळा पाकिस्तान तुम्हाला मिळेल, तो कधीच स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही. माणूस हा हिंदू, मुसलमान होण्याआधी तो सर्वप्रथम भारतीय असेल. त्यामुळे हिंदुस्थानच्या ऐक्याला बाधा येईल, असा पाकिस्तान तुम्ही मागू नका!' मात्र मोहम्मद अली जिना अडेलतट्टू होते. जिन्नांमुळेच अखंड भारताचे दोन तुकडे करावे लागले." हा सगळा तपशील माऊंटबॅटन यांनी मुलाखतकारांना दिलाय.

आता आपण ‘निशान-ए-इम्तियाज’या पुरस्काराकडे वळूया. निशान-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा नागरी सन्मान मानला जातो.

जसा भारतात भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असतो त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्ये 'निशान-ए-पाकिस्तान' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार असतो. जो पाकिस्तानने भारताचे दिवंगत पंतप्रधान मोरारजी देसाई यांना देऊ केला आहे. 

तर जसा भारताचा पद्मविभूषण असतो तसाच पाकिस्तानचा दुसरा उच्च नागरी पुरस्कार हा  निशान-ए-इम्तियाज आहे. जो 1998 साली प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना देण्यात आलेला आणि आता थेट मुंबईच्या दोन दिवंगत डॉक्टरांना...

आता पुन्हा त्या प्रश्नाकडे वळूया की, जर माऊंटबॅटनना जिन्नांच्या आजाराची माहिती 1947 मध्येच मिळाली असती, तर भारताची फाळणी टळली असती का?

याचं ठाम उत्तर इतिहास देऊ शकत नाही. कारण फाळणीमागे अनेक राजकीय, सामाजिक आणि सांप्रदायिक घटक होते.

पण एवढं नक्की होतं की, जिन्नांची प्रकृती ही त्या काळातील अत्यंत संवेदनशील बाब होती. आणि त्यांच्या डॉक्टरांनी ती माहिती सार्वजनिक केली नाही. त्यांनी आपल्या पेशाची गोपनीयता पाळली. आज पाकिस्तान त्याच गोपनीयतेकडे एका वेगळ्या नजरेनं पाहतंय आणि त्याचसाठी त्यांनी मुंबईच्या दोन डॉक्टरांना निशान-ए-इम्तियाज बहाल केलाय.. 

खरं तर कधी-कधी बंद दरवाज्याआड घडलेल्या छोट्या घटनाही पुढे प्रचंड मोठ्या उलथापालथी घडवतात. त्यावेळी देखील मुंबईतील दोन डॉक्टरांनी फक्त आपल्या रुग्णाचं गुपित जपलेलं. पण त्याच गुपिताच्या सावलीत जन्म झाला एका देशाचा...