पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा 22 ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील एआयएसएसएमएस म्हणजेच ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे आठ ते दहा हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कार्यक्रमाला सुमारे 30 अटी आणि नियमांसह परवानगी दिली आहे. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी कार्यक्रमासाठी परवानगी मागितल्यानंतर पुणे शहर पोलीस उपायुक्त कार्यालय, परिमंडळ पाचकडून या अटी जारी करण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नऊ वर्षांच्या मुलीवर भावासमोर लैंगिक अत्याचार, अखेर कुटुंबीयांना सांगितला घटनेचा थरार
अंदाजापेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देऊ नये
पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी अंदाजापेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. स्टेज आणि मंडप अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांकडूनच तयार करून घ्यावा, अशी अट आहे. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्टेज तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यास सांगण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी संबंधित सर्व विभागांची परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नागरिकांच्या प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी किमान चार दरवाजे ठेवावेत, जेणेकरून गर्दी आणि चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होणार नाही, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.
हेही वाचा : 'धनुष्यबाण गोठवा' सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा हा युक्तिवाद निकाल फिरवणार?
कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपवावा
कार्यक्रमासाठी खासगी सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवकांमध्ये महिलांचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही सांगण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी योग्य प्रकाशयोजना, आग प्रतिबंधक साहित्य, पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था करावी लागणार आहे. कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेत संपवावा, तसेच गर्दी, गोंगाट किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची जबाबदारी आयोजकांवर ठेवण्यात आली आहे. पार्किंगची व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या नियमावलीनुसार एअरपोर्ट अथॉरिटी आणि सीआयएसएफने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी आयोजकांना घ्यावी लागणार आहे. कार्यक्रमात ड्रोनद्वारे फोटोग्राफी करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची जबाबदारीही आयोजकांवर राहणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी आक्षेपार्ह प्रतिमा, चित्रे किंवा बॅनर्स लावू नयेत, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुणे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने ही नेहमीची नियमावली असल्याचे सांगितले आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमामुळेच वेगळ्या अटी लावण्यात आल्या आहेत, असे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
ADVERTISEMENT












