Rahul Gandhi sansad marg protest : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलंय. जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनादरम्यान पॅलेट गनचा वापर झाल्याच्या आरोपांशी संबंधित सुरू असलेल्या चौकशीची माहिती घेण्यासाठी ते डीसीपी कार्यालयात गेले होते. या प्रकरणातील तपास आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचला आहे आणि पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली आहे, हे जाणून घेण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न होता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबई : नजर काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला, बहुरुपी तृतीयपंथीयाचा महिलेवर लैंगिक अत्याचार
साहिल लोहबचला सोबत घेऊन राहुल गांधींचा ठिय्या
विशेष म्हणजे, पॅलेट गनच्या कथित वापरामुळे प्रभावित झालेल्या साहिल लोहबच यांनाही राहुल गांधी आपल्या सोबत घेऊन गेले होते. राहुल गांधी यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला असून, काही वेळातच ते माध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा : खासदारपुत्राच्या भरधाव कारने तरुणीला चिरडले, तरीही अटक नाहीच; नेमकं कारण काय?
राहुल गांधी यांनी दिल्ली पोलिसांच्या जॉइंट सीपी नुपूर प्रसाद यांची भेट घेतली. नुपूर प्रसाद यांनी नुकतेच एक-दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला आहे. राहुल गांधी आतमध्ये या प्रकरणाशी संबंधित अनेक तक्रारी घेऊन गेले होते आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, पोलिसांकडून तातडीने कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर राहुल गांधी बाहेर आले आणि अचानक पोलीस ठाण्याबाहेरच बसले. त्यांच्यासाठी खुर्ची लावण्यात आली आणि राहुल गांधी ठिय्या मांडला. यावेळी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आणि सुरक्षाकर्मी घटनास्थळी उपस्थित होते.
नेमंक प्रकरण काय?
जंतर-मंतरवर CJPच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनादरम्यान 20 जुलै रोजी संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली होती. या वेळी आंदोलकांवर कथितपणे पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचे समोर आले होते. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन 20 जून रोजी सुरू झाले होते आणि प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 25 जुलै रोजी आंदोलन संपले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राहुल गांधी संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तपासाची सद्यस्थिती आणि आतापर्यंतचे निष्कर्ष जाणून घेण्यासाठी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावेळी पोलिसांकडून कथितरीत्या झालेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापराची तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय हाय पॉवर्ड एन्क्वायरी कमिटीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्याकडे देण्यात आले आहे. मुख्य न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने 18 ऑगस्ट रोजी हा आदेश दिला होता. या समितीत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रवि शंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषी कुमार शुक्ला आणि मेघालयचे निवृत्त डीजीपी एल. आर. बिश्नोई यांचा समावेश आहे.
पॅलेट गनच्या वापरासह पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित अत्यधिक बळाचा वापर तसेच आंदोलकांकडून पोलिसांवर झालेल्या हिंसाचाराचीही ही समिती चौकशी करणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडी आणि चौकशीचे निष्कर्ष महत्त्वाचे ठरणार आहेत.
ADVERTISEMENT












