छत्रपती संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते, तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?
छत्रपती संभाजीनगरमधील हृदयद्रावक घटनेतील मृत वडील मुरलीधर चांदगोडे यांच्याबद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे. मुरलीधर हे काम करत असलेल्या 'चौधरी रोडवेज'चे मॅनेजर पवन ओटंबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संभाजीनगर प्रकरण : मुरलीधर चांदगुडे काम करत होते
तिथल्या लोकांनी काय खुलासे केले?
Murlidhar Chandgude News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. कौटुंबिक वादातून 19 वर्षांच्या मुलाने टेकडीवरून उडी मारून जीवन संपवले. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा तोल सुटल्याने तेही खाली कोसळले, तर हा संपूर्ण प्रकार डोळ्यांदेखत घडल्याने झालेल्या तीव्र धक्क्यातून आईनेही टेकडीवरून खाली उडी घेतली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस या प्रकरणात विविध अंगांनी तपास करत आहेत.
चौधरी रोडवेजमध्ये ड्रायव्हर
या घटनेतील मृत वडील मुरलीधर चांदगोडे यांच्याबद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे. मुरलीधर हे काम करत असलेल्या 'चौधरी रोडवेज'चे मॅनेजर पवन ओटंबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. पवन ओटंबे यांनी सांगितले की, मुरलीधर हे गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. छत्रपती संभाजीनगर ते गुजरात अशी मालवाहू वाहनाची वाहतूक करण्याचे काम ते करत असत. ते अत्यंत शांत, संयमी आणि प्रत्येकाशी मिळूनमिसळून राहणाऱ्या स्वभावाचे होते; त्यांचे कोणाशीही कधी भांडण किंवा तंट्याचे प्रसंग घडले नव्हते.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना दिलासा मिळणार? 17 वर्षे जुन्या प्रकरणाचा निकाल ठरला!
कोणतेही आर्थिक संकट नव्हते
कंपनीच्या कामात मुरलीधर अत्यंत प्रामाणिक होते आणि दरमहा 30 ते 40 हजार रुपये सहजरीत्या कमवत असत. गुजरातच्या फेरीवरून परतण्यासाठी त्यांना दोन ते चार दिवसांचा वेळ लागत असे आणि या दुर्दैवी घटनेच्या अवघ्या दोन-तीन दिवसांपूर्वीच ते गुजरातचा प्रवास करून घरी परतले होते. त्यांच्यावर कोणतेही आर्थिक संकट किंवा बाजारातील देण्याघेण्याचा ताण असल्याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. तसेच कामाच्या ठिकाणी त्यांनी कधीही आपल्या कौटुंबिक अडचणींचा किंवा मानसिक तणावाचा उल्लेख केला नव्हता, असेही ओटंबे यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : गर्लफ्रेंडने कारवर 3,400 वेळा केले किस, Video व्हायरल
मुलाला 92 टक्के गुण
मुरलीधर यांच्या अशा अचानक जाण्याने कंपनीतील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. "मुरलीधर हे आमच्या कुटुंबातील सदस्यासारखे आणि भावासारखे होते, त्यांच्या अपघाताची बातमी वृत्तवाहिन्यांवरून समजताच आम्हाला मोठा धक्का बसला," अशा शब्दांत मॅनेजर पवन ओटंबे यांनी दुःखावेग व्यक्त केला. मृत मुलाला 92 टक्के गुण मिळाले होते आणि तो अभ्यासात हुशार होता, ही गोष्टही त्यांना बातमीच्या माध्यमातूनच समजली. एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
