Rahul Gandhi chatron ki gunj : देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणी सहभागी झाल्या. हा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. कॅमेऱ्यासमोर राहुल गांधींचा महिलांशी संवाद आणि कार्यक्रमातील विविध मुद्दे पाहायला मिळाले. मात्र, कार्यक्रमाच्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या पलीकडेही अनेक गोष्टी घडत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी इंग्रजीतून भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला. पुणे आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सुरुवात मराठीतून झाली असती तर वेगळा प्रतिसाद मिळाला असता, अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काँग्रेस नेत्यांमध्येही होती. याच कार्यक्रमात एका आदिवासी समाजातील तरुणीने राहुल गांधींसमोर मराठीतून आपल्या समस्या मांडल्या. तिला हिंदीत बोलताना सहज वाटत नसल्याने तिने मराठीतूनच आपले म्हणणे मांडले. काँग्रेसच्या एका स्वयंसेविकेने तिचे म्हणणे राहुल गांधींना भाषांतर करून सांगितले. तिच्या बोलण्याला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. राहुल गांधी यांनीही तिच्याशी संवाद साधत तिला काही प्रश्न विचारले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भारताच्या तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीत? Niti आयोगाचे धक्कादायक आकडे बघाच!
पाणी, जेवण आणि वॉशरूमसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव
या कार्यक्रमात स्थानिक नेत्यांची लांबलचक भाषणे ठेवण्यात आली नाहीत. त्याऐवजी संगीत आणि तरुणांना आवडणारा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यामुळे सुरुवातीपासून आलेल्या तरुणींची गर्दी बराच वेळ टिकून राहिली. मात्र, राहुल गांधी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर काही वेळाने मागील बाजूची गर्दी कमी होऊ लागली. यामागे अनेक कारणे असल्याचे कार्यक्रमस्थळी जाणवले. अनेक तरुणी दुपारी तीन-साडेतीनपासूनच कार्यक्रमासाठी आल्या होत्या. राहुल गांधी साडेसातच्या सुमारास आले. त्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठीही वेळ लागणार होता. पुण्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेता काही जणी लवकर निघाल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी बसण्याची सोय नव्हती. अनेकांना बराच वेळ उभे राहावे लागले. खाण्यापिण्याची सुविधाही उपलब्ध नव्हती. पाणी, जेवण आणि वॉशरूमसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही सांगण्यात आले. महिलांच्या कार्यक्रमात मासिक पाळीच्या काळातील गरजा आणि वॉशरूमची सुविधा यांचाही विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया काही महिलांनी व्यक्त केली.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग संथ, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्टचा अंदाज
राहुल गांधी यांनी मांडलेल्या विचारांना तरुणींकडून चांगला प्रतिसाद
कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माध्यमांसाठी असलेली मर्यादित जागा. हा कार्यक्रम महिलांसाठी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पुरुष कॅमेरामनना महिलांच्या गर्दीत जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे अनेक तरुणींच्या प्रतिक्रिया माध्यमांना घेता आल्या नाहीत. काही महिला पत्रकारांनी गर्दीत जाऊन कडेला उभे राहून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टेजसमोरील गर्दीपर्यंत पोहोचता आले नाही. या गर्दीत अनेक तरुणी राहुल गांधींसाठी संदेश लिहिलेले मोबाईल आणि प्लॅकार्ड घेऊन उभ्या होत्या. त्यामुळे त्यांच्याशी थेट संवाद साधता आला नाही. काँग्रेसच्या अंदाजानुसार या कार्यक्रमाला सुमारे दहा हजार महिला येण्याची अपेक्षा होती. मात्र, नंतरची संख्या सुमारे 15 हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. महिलांच्या समान हक्कांबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल राहुल गांधी यांनी मांडलेल्या विचारांना तरुणींकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक तरुणींचे लक्ष पक्षाच्या राजकारणापेक्षा त्यांच्या प्रश्नांवर होते. काही तरुणींनी राहुल गांधींकडून अपेक्षा असल्याचे सांगितले. त्यांच्यासाठी राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा कोण त्यांच्या मुद्द्यांवर बोलते, हे महत्त्वाचे असल्याचे जाणवले. कार्यक्रमात काँग्रेसचा झेंडा किंवा पक्षाचे चिन्ह ठळकपणे वापरण्यात आले नाही. त्यामुळे हा काँग्रेसचा कार्यक्रम नसून तरुणींसाठीचा अराजकीय कार्यक्रम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राहुल गांधी यांनी महिलांशी संबंधित मुद्द्यांवरच अधिक भर दिला. योगी आदित्यनाथ, नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या महिलांबाबतच्या वक्तव्यांच्या व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आल्या. मात्र, सरकारवर किंवा इतर राजकीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी विशेष टीका केली नाही. एकूणच, तरुणींचा मोठा सहभाग, महिलांच्या प्रश्नांवर झालेली चर्चा, भाषेचा मुद्दा आणि कार्यक्रमातील व्यवस्थेतील त्रुटी यामुळे पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम कॅमेरापलीकडेही चर्चेत राहिला.
ADVERTISEMENT












