Rohit Pawar : महाराष्ट्र राज्ससेवा आयोगाने औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया अखेर रद्द केली आहे. गट ब च्या पदांसाठी झालेल्या या भरतीत पेपरलीक झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या भरतीतील गैरप्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असले तरी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. रोहित पवार यांनी नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले आहेत, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी
पेपरलीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSC ने आज रद्द केली. पेपरलीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुरव्यासकट समोर आणला, तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला, अखेर आज तपासात पेपरलीक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
आयोगाने पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचे आयोगाचे स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखे नाही. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेटमार्फत 40-40 लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहीत आहे.
आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा तसेच आम्ही ज्या एजंट लोकांची नावे दिली होती त्यांचे काय झाले? आयोगातून कोणी सहभागी आहे का? कोणाचा वरदहस्त आहे? हे देखील सांगावे. आयोगाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मात्र गप्प बसणार नाही.
आयोगाचा पेपर लीक होणे ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तत्काळ राजीनामा द्यावा. सरकारने देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी.
हे ही वाचा : कुणालने उडी मारली तेव्हा काय घडलं? प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
पुढे काय होणार?
औषध निरीक्षक पदाची 22 मार्च रोजी चाचणी परीक्षा पार पडली होती. त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखती होऊन तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाने प्रसिद्ध केली होती. मात्र ही भरती रद्द करुन आता पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT












