मुंबई: गणेशोत्सवाला काही दिवस बाकी असतानाच मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांमध्ये उद्योगसमूहांचा वाढता सहभाग आणि मोठ्या मूर्तींच्या स्पर्धेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मातीतला सण असून, तो कॉर्पोरेट वॉरचा भाग बनता कामा नये, अशी भूमिका देशपांडे यांनी मांडली.
ADVERTISEMENT
लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचा उद्योगसमूहांशी झालेला करार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कॉर्पोरेट स्पर्धेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. “गणेशोत्सव हा आमचा सण होता. कॉर्पोरेट वॉरचा भाग ही जर गणेशोत्सव मंडळं होत असतील, तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही,” असं देशपांडे म्हणाले.
‘उद्या गणपतीमध्ये गरबा बघायचा का?’
गणेशोत्सवातील वाढत्या कॉर्पोरेट सहभागावर टीका करताना देशपांडे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. “उद्या काय, अदानी आणि अंबानींच्या हातात गणपती देऊन उद्या काय आम्ही गणपतीमध्ये गरबा बघायचा का?” असा सवाल त्यांनी केला.
हे ही वाचा>> मुंबई : गणपती आगमनाला गालबोट, भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू; काय घडलं?
''गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी पैसे लागतात, हे मान्य.. पण किती पैसे लागतात तुम्हाला? भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मंडळांना देणग्या येतात. आज लालबागच्या राजामध्ये करोडो रुपये जमा होतात ना? लोक स्वतः येऊन तुम्हाला देणग्या देतात. मग कशाला तुम्हाला अंबानी पाहिजे?” असा सवाल त्यांनी केला.
‘अनंत अंबानींना सल्लागार म्हणून का घेतलं?’
देशपांडे यांनी लालबागच्या राजा मंडळाच्या उद्योगसमूहाशी असलेल्या संबंधांवरही प्रश्न उपस्थित केला. “अनंत अंबानी असा कुठला सल्ला देतात लालबागच्या राजाला, की त्यासाठी त्यांना सल्लागार म्हणून नेमलं?” असा खोचक प्रश्नही संदीप देशपांडे यांनी यावेळी उपस्थित केला.
गणेशोत्सव मंडळं कंपनी करायची आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुढे म्हटलं की, एका उद्योगसमूहाच्या सहभागानंतर आता इतर उद्योगसमूहही या क्षेत्रात येतील आणि त्यातून मंडळांमध्ये कॉर्पोरेट स्पर्धा वाढू शकते.
हे ही वाचा>> Govt Jobs : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये नोकरीची संधी, 80 हजारांहून अधिक पगार
“उद्या अजून जेएसडब्ल्यू येईल, उद्या अजून गोदरेज येईल. मग गणेशोत्सव मंडळं हे काय कॉर्पोरेट वॉरचं तुम्हाला ठिकाण बनवायचं आहे का?” असा सवाल देशपांडे यांनी केला.
‘मराठी माणसाचा मातीतला सण उद्योगपतींच्या हातात द्यायचा आहे का?’
गणेशोत्सवाच्या पारंपरिक स्वरूपाचा दाखला देत देशपांडे म्हणाले की, हा महाराष्ट्रातला आणि मराठी माणसाचा मातीतला सण आहे. त्यामुळे तो उद्योगपतींच्या हातात देण्याबाबत मंडळांनी विचार करण्याची गरज आहे.
“हा महाराष्ट्रातला, मराठी माणसाचा, मातीतला सण आहे. तो या उद्योगपतींच्या हातात तुम्हाला द्यायचा आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याचवेळी त्यांनी गुजरातमधील उद्योगसमूहांचा संदर्भ देत गणेशोत्सव मंडळांनी आपली भूमिका तपासावी, असं आवाहन केलं.
‘इतिहास माफ करणार नाही’
लालबागच्या राजा मंडळाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांच्यावरही देशपांडे यांनी टीका केली. साळवी हे आपले चांगले मित्र असल्याचं सांगत, त्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असल्याचं देशपांडे म्हणाले.
“याचा सर्वात मोठा जर दोषी कोण असेल, तर ते लालबागच्या राजाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांना.. हे माझं स्पष्ट मत आहे. इतिहास त्यांना माफ करणार नाही. ते माझे चांगले मित्र आहेत, पण ही जी काही भूमिका त्यांनी घेतली आहे, अत्यंत चुकीची भूमिका आहे,” अशी टीका यावेळी देशपांडेंनी केली आहे.
‘गणेशोत्सव मार्केटिंगचं ठिकाण आहे का?’
उद्योगसमूहांकडून होणाऱ्या गुंतवणुकीमागील उद्देशावरही देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केला. अदानी, अंबानी यांच्यासारखे उद्योगपती फक्त नफ्याच्या दृष्टीने काम करतात, त्यामुळे गणेशोत्सव मंडळं मार्केटिंगचं व्यासपीठ बनू नयेत. असं मत देशपांडेंनी व्यक्त केलं.
“गणपती मार्केटिंग ठिकाण आहे का? की इथे बाबा अंबानीचे बॅनर लागतील, इथे अदानीचे बॅनर लागतील, इथे काय जेएसडब्ल्यूचे बॅनर लागतील?” असा सवाल त्यांनी केला.
‘उद्या अंबानी गणपती, अदानी गणपती अशी नावं होतील का?’
कॉर्पोरेट सहभाग असाच वाढत राहिला, तर भविष्यात प्रसिद्ध गणपतींची ओळखही उद्योगसमूहांच्या नावाने होण्याची शक्यता असल्याचं सांगत देशपांडे यांनी गणेशोत्सव मंडळांना आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केलं.
“नाहीतर उद्या 50 वर्षांनी लालबागच्या राजाचं नाव अंबानी गणपती असेल आणि चिंतामणीचं नाव अदानी गणपती असेल. हे तुम्हाला पाहिजे का? हे तुम्हाला चालणार आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
मोठ्या गणेशमूर्तींच्या स्पर्धेवरही सवाल
गणेशोत्सवातील मोठ्या मूर्तींच्या वाढत्या स्पर्धेवरही देशपांडे यांनी चिंता व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी उंच गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत त्यांनी मूर्तीची उंची, तिची सुरक्षितता आणि निगा राखण्याची क्षमता यांचा विचार करण्याची गरज असल्याचं सांगितलं.
“मूर्ती किती उंच असावी, काय असावी, आपल्याला ती एवढी उंच मूर्ती बनवून आपण त्याची निगा राखू शकतो का?, या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे ना,” असं ते म्हणाले.
गणेशमूर्ती कोसळून एका कुटुंबावर आलेल्या संकटाचा उल्लेख करत त्यांनी, अशा घटनांमुळे निर्माण होणाऱ्या वेदनेचा समाजाने विचार करायला हवा, असं सांगितलं.
‘दोन फुटाचा गणपती इच्छा पूर्ण करत नाही आणि 23 फुटाचा करतो, हे कुठल्या धर्मात सांगितलंय? माझ्या हिंदू धर्मात तरी तसं सांगितलेलं नाही.’ असं म्हणत देशपांडे यांनी गणेशमूर्तीच्या उंचीवरून होणाऱ्या स्पर्धेवर धार्मिक संदर्भ देतही प्रश्न उपस्थित केला. गणेशोत्सव मंडळांमधील स्पर्धा लोकांच्या जीवावर बेतता कामा नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
‘कॉर्पोरेट पैसे आले तर स्पर्धा आणखी वाढेल’
कॉर्पोरेट कंपन्यांकडून गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध झाला, तर मंडळांमधील स्पर्धा आणखी वाढू शकते, असा दावा देशपांडे यांनी केला.
“आता जर कॉर्पोरेट लोक जर याच्यात पैसे इन्व्हेस्ट करणार असतील, तरी अशीच कॉम्पिटिशन वाढत जाणार. उद्या 50 फुटाच्या मूर्ती कराल तुम्ही, कारण पैसे येतात. अदानी पैसे देतोय, गोदरेज पैसे देतोय, अंबानी पैसे देतोय,” असं ते म्हणाले. “खड्डे आहेत आगमन मार्गावर. खड्डा हा विषय आहेच,” असं ते म्हणाले.
सरकार रस्त्यांवरील खड्डे बुजवणार नसेल, तर गणेशमूर्तींच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मंडळांनीही केवळ सरकारवर अवलंबून न राहता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘फक्त खड्ड्यांमुळे दुर्घटना झाली असं मला वाटत नाही’
गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनेमागे केवळ रस्त्यांवरील खड्डे कारणीभूत असल्याचं आपल्याला वाटत नसल्याचं देशपांडे यांनी स्पष्ट केलं. संबंधित मूर्तिकाराची प्रतिक्रिया आपण पाहिल्याचा उल्लेख करत त्यांनी समाज म्हणून या घटनांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली.
‘हिंदुत्वाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी होता कामा नयेत’
शेवटी महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा उल्लेख करत देशपांडे यांनी धार्मिक परंपरांमध्येही काळानुसार आवश्यक ते बदल झाले पाहिजेत, अशी भूमिका मांडली.
“महाराष्ट्रातला समाज हा नेहमी पुरोगामी राहिलेला आहे. धर्मामध्ये सुद्धा वारंवार बदल आपण ज्या गोष्टी चुकीच्या असतील, त्याच्यामध्ये केलेले आहेत. फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली, मला वाटतं, चुकीच्या गोष्टी होता कामा नाहीत,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.
एकूणच, गणेशोत्सवातील वाढता कॉर्पोरेट सहभाग, उद्योगसमूहांच्या प्रायोजकत्वातून निर्माण होणारी स्पर्धा, मोठ्या मूर्तींची चढाओढ आणि गणेशमूर्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या मुद्द्यांवर संदीप देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत गणेशोत्सव मंडळांनी आत्मपरीक्षण करण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT












