‘103 दिवस तुरुंगात राहिले, त्यांनी मोदींवर बोलावं?’ चित्रा वाघ राऊतांवर एवढ्या का संतापल्या?

मिथिलेश गुप्ता

• 08:46 PM • 03 Sep 2026

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 103 दिवसांच्या तुरुंगवासाचा आणि पत्राचाळ प्रकरणाचा संदर्भ देत वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधला.

bjp leader chitra wagh criticized sanjay raut pm modi 103 days jail remark

चित्रा वाघ

Google CTA

बदलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या तुरुंगवासाचा आणि पत्राचाळ प्रकरणाचा संदर्भ दिला आहे.

हे वाचलं का?

‘संजय राऊत काय बोलतात यापेक्षा ते कोणावर बोलत आहेत, हे महत्त्वाचं आहे. 103 दिवस तुरुंगात राहिलेल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलावं, हे हास्यास्पद आहे,’ असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला.

बदलापूरमध्ये भाजपची संघटनात्मक बैठक

बदलापूरमध्ये भाजपच्या वतीने संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चित्रा वाघ यांनी महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राऊत यांच्या तुरुंगवासाचा आणि पत्राचाळ प्रकरणाचा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला.

हे ही वाचा>> दिशा सालियन प्रकरण CBI कडे गेल्यावर आदित्य ठाकरेंनी दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया

‘103 दिवस तुरुंगात राहिलेले खासदार’

चित्रा वाघ म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनेक देशांनी सन्मान केला आहे. अशा पंतप्रधानांवर टीका करणारे संजय राऊत हे 103 दिवस तुरुंगात राहिलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले खासदार आहेत, असा दावा त्यांनी केला. राऊत यांच्या राजकीय भूमिकेवरही वाघ यांनी टीका केली. ‘संजय राऊत हे निवडून आलेले खासदार नाहीत, तर निवडून दिलेले खासदार आहेत,’ असं त्या म्हणाल्या.

‘राष्ट्रभक्तीसाठी तुरुंगात गेले नव्हते’

संजय राऊत यांच्या तुरुंगवासाचा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी त्यावरही भाष्य केलं. ‘राऊत तुरुंगात गेले होते, पण राष्ट्रभक्तीसाठी गेले नव्हते,’असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी पत्राचाळ प्रकरणाचाही उल्लेख केला. मराठी लोकांची घरं खाणारे आणि त्यांची फसवणूक करणारे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत, हे हास्यास्पद असल्याचा घणाघात चित्रा वाघ यांनी केला.

हे ही वाचा>> विद्यानंद बापटांना मारहाण करणारा मंडळाचा मारकुट्या कार्यकर्ता कोण? कुंडली आली समोर

मोदींवरील टीकेवरून राजकीय संघर्ष तीव्र

संजय राऊत यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेनंतर चित्रा वाघ यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजप आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्षाला पुन्हा धार आली आहे. एका बाजूला राऊतांकडून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर टीका केली जात असताना, दुसऱ्या बाजूला भाजपकडून राऊतांच्या वक्तव्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय पार्श्वभूमीचा संदर्भ देत प्रत्युत्तर दिलं जात आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.