सकाळच्या पेपरला 121 मार्क, दुपारच्या पेपरला 2 मार्क, MPSC चा काय अजुबा ?

मुंबई तक

03 Sep 2026 (अपडेटेड: 03 Sep 2026, 10:29 AM)

mpsc exam discrepancies students protest : MPSCच्या परीक्षांमधील कथित त्रुटींवरून विद्यार्थ्यांचा संताप वाढला आहे. 121 आणि 2 गुणांच्या फरकापासून ते कटऑफपेक्षा 50 गुण अधिक असूनही मुलाखतीची संधी न मिळाल्याच्या दाव्यापर्यंत विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

Student Protest Against MPSC

Student Protest Against MPSC

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सकाळच्या पेपरला 121 मार्क, दुपारच्या पेपरला 2 मार्क, MPSC चा काय अजुबा ?

point

MPSCच्या परीक्षांमधील कथित त्रुटींवरून विद्यार्थ्यांचा संताप वाढला

Student Protest Against MPSC : MPSCच्या परीक्षांमध्ये वारंवार त्रुटी आणि अनियमिततेचे आरोप होत असताना आता विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांचा संताप अधिक तीव्र झाला असून, याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात MPSCच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षांमध्ये आलेल्या कथित विसंगतींची उदाहरणं मांडत आयोगाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. एका विद्यार्थ्याने सांगितलं की, त्याच्या प्रवर्गाचा कटऑफ 763 असताना त्याला 813 गुण मिळाले, म्हणजेच कटऑफपेक्षा तब्बल 50 गुण अधिक असूनही त्याला मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं नाही. मराठी विषयात तो पात्र ठरला, मात्र इंग्रजीमध्ये पात्र गुण न मिळाल्यामुळे त्याची मुलाखतीची संधी गेल्याचं त्याचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Maharashtra Weather : येरे येरे पावसा, काही जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्टचा अंदाज

सकाळच्या पेपरला 250 पैकी 121 गुण आणि दुपारच्या पेपरला अवघे 2 गुण

याच विद्यार्थ्याने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 मध्ये आपल्या गुणांबाबतही प्रश्न उपस्थित केला. त्याच्या म्हणण्यानुसार, मराठी विषयात 300 पैकी 127 गुण मिळाले, तर इंग्रजीमध्ये 67 गुण मिळाले. दुसरीकडे निबंधासाठी 250 पैकी 195 गुण मिळाल्याचं त्याने सांगितलं. त्यामुळे एका विषयात चांगले गुण मिळूनही इंग्रजीतील गुणांमुळे मुलाखतीपासून वंचित राहावं लागल्याचा दावा त्याने केला. त्याचबरोबर त्याने आणखी एका विद्यार्थ्याचं उदाहरण देत भूगोलाच्या पेपरमध्ये सकाळच्या पेपरला 250 पैकी 121 गुण आणि दुपारच्या पेपरला अवघे 2 गुण मिळाल्याचं सांगितलं. एकाच दिवशी, एकाच विषयाच्या दोन पेपरमध्ये 121 आणि 2 अशा गुणांमध्ये मोठी तफावत कशी असू शकते, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. पेपरची फेरतपासणी न करता केवळ गुणांची बेरीज तपासण्याची प्रक्रिया असल्याने आपल्याला न्याय मिळणार नसल्याचीही विद्यार्थ्यांची भूमिका आहे.

हेही वाचा : मुकेश अंबानींचा काय आहे 10 रुपयांचा मास्टरप्लॅन? नवा जुगाडाची तुफान चर्चा!

7000 पदांची जाहिरात काढली, मात्र अंतिम निकालानंतर सुमारे 4400 पदांवर नियुक्ती

आंदोलनात 2023च्या लिपिक टंकलेखक परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनीही आपली व्यथा मांडली. आयोगाने जवळपास 7000 पदांची जाहिरात काढली होती, मात्र अंतिम निकालानंतर सुमारे 4400 पदांवर नियुक्ती झाल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित पदं रिक्त असल्याचा दावा करत, खुल्या प्रवर्गातील जवळपास 500 जागा आणि प्रतीक्षा यादीतील सुमारे 1700 ते 1800 विद्यार्थ्यांच्या जागांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. 2023च्या जाहिरातीत प्रतीक्षा यादीचा उल्लेख असतानाही नंतर ती लावण्यात आली नाही, तर 2024 आणि 2025च्या जाहिरातींमध्ये प्रतीक्षा यादी लावण्यात आली, मग 2023च्या विद्यार्थ्यांवरच अन्याय का, असा सवाल करण्यात आला. आयोगाचा हा निर्णय मनमानी कारभार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्याचवेळी ग्रुप बी 2025च्या परीक्षेतील पदे आणि उमेदवारांच्या क्रमांकांबाबतही विद्यार्थ्यांनी संशय व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी MPSCच्या तयारीसाठी आपली अनेक वर्षे दिल्याचं सांगितलं. काही विद्यार्थी सहा वर्षांपासून, तर काहींनी राज्यसेवेच्या अनेक प्रयत्नांनंतरही यशाच्या उंबरठ्यावर येऊन अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं. एका विद्यार्थ्याने आठवा प्रयत्न असल्याचं सांगितलं, तर दुसऱ्या विद्यार्थ्याने सहा वर्षे MPSCचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं. घरची आर्थिक परिस्थिती, कुटुंबाच्या अपेक्षा आणि वर्षानुवर्षे सुरू असलेली तयारी यामुळे विद्यार्थ्यांवर मोठा ताण असल्याचं या संवादातून समोर आलं. विद्यार्थ्यांचा मुख्य सवाल MPSCच्या कार्यपद्धतीवरील विश्वासाचा आहे. परीक्षांभोवती निर्माण झालेला संशय दूर करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचं आव्हान आयोगासमोर असल्याचं आंदोलनातून स्पष्ट झालं.