भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला थेट दिली सत्ता सोडण्याची धमकी.. 'ते' नेमकं प्रकरण काय?

मिथिलेश गुप्ता

• 07:00 AM • 04 Sep 2026

मनसेच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप हे KDMC मध्ये आमनेसामने आले आहेत. मनसेला बाहेर काढा, अन्यथा युती तोडा असा अल्टिमेटमच भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला दिला आहे.

bjp directly threatens shindes shiv sena with quitting power what exactly is kdmc matter

भाजप वि. शिवसेना

Google CTA

कल्याण: मनसे आणि भाजपमधील राजकीय वादाचे पडसाद आता थेट कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महायुतीच्या सत्ता-समीकरणावर उमटू लागले आहेत. मनसेला सत्तेतून बाहेर काढावे, अन्यथा महायुतीतून बाहेर पडण्याची भूमिका घ्यावी, अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना याबाबत अधिकृत पत्र दिल्याने KDMC मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

हे वाचलं का?

दरम्यान, आज (3 सप्टेंबर) कल्याणमध्ये भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत सर्व सदस्यांनी एक निर्णय घेऊन वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आले असल्याची माहिती भाजपचे उपमहापौर राहुल दामले यांनी दिली आहे. आता आम्ही सत्तेत राहायचे की विरोधी बाकावर बसायचे हा निर्णय वरिष्ठ घेतील असेही राहुल दामले म्हणाले.

अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याच्या वादानंतर भाजपने मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. मनसेसोबत सत्तेत बसणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. भाजपच्या गटनेता कार्यालयातील बैठकीतही मनसेसोबतची युती तोडली नाही, तर विरोधी बाकांवर बसण्याची भूमिका मांडण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे KDMC मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सत्तासमीकरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपचे शिवसेनेला पत्र

भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र देत मनसेला सत्तेच्या समीकरणातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. महायुती कायम ठेवायची असेल तर मनसेसोबतची आघाडी तातडीने संपवावी, अशी भाजपची ठाम भूमिका असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटानेही आक्रमक पलटवार केला आहे.

हे ही वाचा>> दिशा सालियन प्रकरण CBI कडे गेल्यावर आदित्य ठाकरेंनी दिली 'ही' पहिली प्रतिक्रिया

‘मलाई खायला आलात, आता आम्हाला इशारे देऊ नका’

शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी भाजपला थेट प्रत्युत्तर दिले आहे. ‘सत्तेत मलाई खाण्यासाठी आलात, आम्ही गट स्थापन केला तेव्हा युती धर्माची आठवण का आली नाही?’ असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे. मनसेसोबत काय करायचे, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यामुळे भाजपने शिवसेनेला इशारे देऊ नयेत, अशी भूमिका राजेश कदम यांनी मांडली आहे.

मनसेला सत्तेत आणले कोणी? शिवसेनेचा सवाल

KDMC मध्ये शिवसेनेने मनसेसोबत गट स्थापन करून सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपही सत्तेत सहभागी झाली होती, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता मनसेच्या मुद्द्यावरून भाजपने घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले आहेत. युती तोडण्याच्या वल्गना करू नका, तुमचा निर्णय तुम्ही घ्या, असा थेट पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> ‘103 दिवस तुरुंगात राहिले, त्यांनी मोदींवर बोलावं?’ चित्रा वाघ राऊतांवर एवढ्या का संतापल्या?

मोदींचा फोटो हटवणे चुकीचेच; पण मनसेबाबत निर्णय वरिष्ठांचा

अमित ठाकरे यांनी नरेंद्र मोदींचा फोटो हटवल्याच्या घटनेचे शिवसेनेने समर्थन केलेले नाही. ‘जे झालं ते चुकीचं झालं,’ अशी भूमिका शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र, या घटनेच्या पार्श्वभूमीवर KDMC मधील सत्तासमीकरण बदलण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार नसून मनसेबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

अंबरनाथ, भिवंडी, बदलापूरच्या राजकारणावरही सवाल

दरम्यान, शिवसेनेने भाजपच्या अंबरनाथ, भिवंडी आणि बदलापूरमधील राजकीय भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. या ठिकाणी भाजपने घेतलेल्या भूमिकांचा दाखला देत KDMC मध्येच युती धर्माची आठवण का करून दिली जात आहे, असा सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे. नंदू परब यांच्या पत्रानंतर राजेश कदम यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे KDMC मधील शिवसेना-भाजप संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याच्या भाजपच्या मागणीवर शिवसेना काय निर्णय घेणार आणि त्याचा महापालिकेतील सत्तेवर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजप आपल्या भूमिकेवर ठाम राहून विरोधी बाकांवर बसणार का? शिवसेना मनसेसोबतची आघाडी कायम ठेवणार का? की वरिष्ठ पातळीवरून महायुतीबाबत नवा निर्णय होणार? या प्रश्नांमुळे KDMC मधील राजकारण येत्या काळात आणखी तापण्याची चिन्हे आहेत.