'अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका,' सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना थेट सुनावलं!

मुंबई तक

• 10:00 AM • 04 Sep 2026

अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सवाल उपस्थित केले. यावर सुनेत्रा पवार यांनी तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करत, दादांच्या जाण्याचं राजकारण करू नये, असं सुनावलं आहे.

ajit pawar death flight accident inquiry supriya sule sunetra pawar reaction

सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना सुनावलं

Google CTA

पुणे: अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी सरकारमधील 40 आमदार आणि 8 ते 9 मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “माझ्या भावाच्या एफआयआर किंवा चौकशीबद्दल एक शब्द तरी काढलाय का?” असा सवाल केला. यावर सुनेत्रा पवार यांनी थेट प्रतिक्रिया देत, “दादांच्या जाण्याचं अशा प्रकारचं राजकारण कोणीच करू नये,” असं म्हटलं. तसंच, चौकशी लवकरात लवकर व्हावी, अशी कुटुंबाचीही इच्छा असून तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं.

हे वाचलं का?

अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. अजितदादा याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्या अपघाताचा एफआयआर का झाला नाही, असा सवाल त्यांनी केला.

“आमच्या घरातील कर्ता पुरुष गमवलाय आम्ही. यांच्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते ना. त्याचा एफआयआर केला नाही, पण अमित ठाकरेंचा एफआयआर दोन तासांत झाला. हा कुठला न्याय?”

हे ही वाचा>> Center Point | विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?

सुप्रिया सुळे यांनी पुढे सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांवरही निशाणा साधला. अजित पवार यांचे 40 आमदार आणि 8 ते 9 मंत्री सत्तेत आहेत. मात्र, त्यापैकी एकानेही अजितदादांच्या एफआयआर किंवा चौकशीबद्दल एक शब्द काढलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

“त्या 40 आमदार आणि 8 की 9 मंत्र्यांनी कधी तरी माझ्या भावाच्या एफआयआर किंवा चौकशीबद्दल एक शब्द तरी काढलाय का? एक.. एक शब्द.. मग माझ्या भावाचं काय? भाऊ आमचा गेलाय ओ.. त्यानंतर सत्ता हे भोगतायेत.”

सुनेत्रा पवारांचं सुप्रिया सुळेंना थेट उत्तर

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि दुःख त्यांच्या कुटुंबापेक्षा अधिक कोणाला माहिती असणार, असा सवाल त्यांनी केला.

“खरं सांगायचं तर, आदरणीय अजितदादा गेल्याचं.. सगळ्या महाराष्ट्राबरोबर जी पोकळी निर्माण झाली आहे ती आणि आकाश कोसळलेलं आहे. ते माझ्या आणि माझ्या मुलापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार?”

हे ही वाचा>> पुण्यात गणेशोत्सवात DJ वाजणार की नाही? CM यांनी स्पष्टच सांगितलं

सुनेत्रा पवार यांनी सांगितलं की, अजित पवार यांच्या घटनेबाबत लवकरात लवकर निर्णय कळावा, अशी त्यांचीही इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री आणि संबंधित सर्वांची भेट घेतली आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, तपास यंत्रणांवर विश्वास आहे’

अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात शब्द दिला असून, तो पाळण्यासाठी ते अथक प्रयत्न करत आहेत, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.

तसंच, तपास यंत्रणा आपलं काम करत असून, कायदा आणि संविधान यांनी निर्माण केलेल्या प्रक्रियेवर आपला विश्वास असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

“नक्कीच, तपास यंत्रणाही आपलं काम करत आहे. तपास यंत्रणा, कायदा आणि संविधान यांनी निर्माण केलेल्या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास आहे. मला असं वाटतं की, त्यांनाही आपण वेळ दिला पाहिजे.”

‘फक्त सतत मीडियात येणं म्हणजे अपडेट मिळणं नाही’

अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत वारंवार माध्यमांमध्ये बोलणं म्हणजेच तपासाचा अपडेट मिळणं नाही, असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे मीडिया ट्रायल होण्याची शक्यता आहे का, याचा विचार सर्वांनी करायला हवा, असं त्यांनी सांगितलं.

“फक्त सतत मीडियात येणं म्हणजेच अपडेट मिळणं असं नाही. वारंवार अशा गोष्टी केल्यामुळे मीडिया ट्रायल होते का, असं मला वाटतं. त्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे.”

‘दादांच्या जाण्याचं राजकारण कोणीच करू नये’

अजित पवार यांच्या कुटुंबाला या घटनेचं सर्वाधिक दुःख असल्याचं सांगत सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याला उत्तर दिलं. अजितदादांची आई, त्यांची मुलं आणि आपण यांच्यापेक्षा जास्त दुःख कोणाला होणार, असा सवाल त्यांनी केला.

“दादांची आई, दादांची मुलं आणि मी.. आमच्यापेक्षा जास्त दुःख कोणाला होणार आहे? त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जास्तीत जास्त लवकर चौकशी व्हावी, असं आम्हालाही वाटतं.”

तपास यंत्रणेला वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्यावर आपला विश्वास आहे, असं सुनेत्रा पवार यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

“दादांच्या जाण्याचं अशा प्रकारचं राजकारण कोणीच करू नये, असंच मला वाटतं. बस, एवढंच.” असं म्हणत सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना थेट सुनावलं आहे.