Center Point | विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?

मुंबई तक

Center Point : गणेशोत्सवातील DJ आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यात हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचवेळी सोशल मीडिया क्रिएटर संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक झाल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.

ADVERTISEMENT

Center Point
Center Point
Google CTA

बातम्या हायलाइट

point

विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?

Center Point : आजची गोष्ट सुरू होते एका नदीपासून. एका नदीला जबरदस्त पूर आलेला असतो. एक मच्छीमार नदीच्या काठावर बसून मासेमारी करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात त्याला नदीमध्ये एक नवीकोरी गोधडी वाहत जाताना दिसते. त्याच्यातला स्वार्थ जागा होतो आणि त्याला वाटतं की ही गोधडी आपल्याला मिळाली तर आपलं कामच होईल. मग तो वाहत्या पाण्यात उडी मारतो. गोधडी त्याच्या हाताला लागते, पण ती प्रचंड भिजलेली असते. त्यामुळे ती गोधडीच त्या मच्छीमाराला ओढत घेऊन जाऊ लागते. पाण्यामध्ये मच्छीमार ओरडायला लागतो, “अरे, ही गोधडी मला सोडत नाहीये! गोधडी मला सोडत नाहीये!” खरं तर मच्छीमार गोधडीला सोडत नसतो. ही गोष्ट माणसाच्या मानसिक गुलामगिरीची आणि दुःखाची आहे. जोपर्यंत तो ते सोडत नाही, तोपर्यंत ती गुलामगिरी आणि ते दुःखही त्याला सोडत नाही. तुम्ही म्हणाल की आजच्या विषयाचा आणि या गोष्टीचा काय संबंध? तर ते जाणून घेऊयात..

विद्यानंद बापट तुम्हाला माहिती असतील. पुण्याचे विद्यानंद बापट सध्या खूप गाजत आहेत. सगळीकडे त्यांच्या मुलाखती होत आहेत. कारण काय आहे? तर त्यांनी डीजेला विरोध केलेला आहे. त्यांनी ढोल-ताशांच्या आवाजाला विरोध केलेला आहे. रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या मंडपांना विरोध केलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव व्हावा, यासाठी त्यांचा आग्रह आहे. आता मुद्दा काय आहे? हे विद्यानंद बापट मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत आणि आता नारायण पेठेमध्ये राहतात. ते बीपीओमध्ये काम करतात. त्यांची उंची असेल पाच-साडेपाच फूट आणि वजन असेल 50-52 किलो. पण या माणसाची हिंमत बघा. या माणसाने अख्ख्या व्यवस्थेलाच आव्हान दिलंय. कुठल्या व्यवस्थेला? ज्या व्यवस्थेने आपल्या पूर्ण समाजमनाला हिंदुत्वाशी जोडलं, त्या व्यवस्थेला त्यांनी आव्हान दिलं. म्हणजे केवढी मोठी हिंमत दाखवली! गणेशोत्सवाच्या आधी पालिकेने एक सभा बोलावली होती. त्यामध्ये गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मतं जाणून घेतली जात होती. त्यामध्ये हे महाशय उभे राहिले आणि विद्यानंद बापटांनी तिथे सडेतोडपणे पाच-सात मिनिटांचं भाषण केलं. ते म्हणाले की, या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा हेतू आपण विसरत चाललो आहोत. प्रचंड ध्वनी प्रदूषण होतं. मंडळं रस्त्यावर मंडप टाकतात. 60 ते 70 टक्के रस्ता मंडपामध्ये जातो. शहरात ट्रॅफिक जाम होतं. लहान मुलं, वृद्ध माणसं, कुत्री-मांजरींसारखे प्राणी या डीजेच्या भिंतींच्या आणि ढोल-ताशांच्या आवाजाने घाबरून जातात. त्याचा कानांवर परिणाम होतो. डीजे आणि अलीकडच्या काळातील सगळी वाद्यं ही एक प्रकारे आपला उत्सव चुकीच्या पद्धतीने प्रोजेक्ट करतात, असं त्यांचं म्हणणं होतं.

पण मग विषय आला की ढोल-ताशे तर पारंपरिक वाद्य आहेत, मग त्याचं काय करायचं? तर त्याचंही त्यांच्याकडे उत्तर होतं. ते म्हणाले की, ढोल-ताशे कशासाठी वाजवले जायचे? पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी युद्ध व्हायचं, त्यावेळी योद्ध्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्यामध्ये उत्साह संचारावा म्हणून ते वाजवले जायचे. ते रणांगणातली वाद्यं आहेत. बंदिस्त शहरांमध्ये वाजवली जाणारी वाद्यं नाहीत. आता शहर चारही बाजूंनी सिमेंटच्या जंगलाने बंद झालं आहे. तिथे तुम्ही ती वाद्यं वाजवत आहात, त्यामुळे खूप त्रास होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ती तुम्ही हमरस्त्यावर वाजवता. कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये किंवा नदीपात्रामध्ये वाजवत नाही. त्यामुळे त्याचा लोकांच्या आरोग्यावर प्रचंड परिणाम होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग त्यांनी उदाहरण दिलं की, गेल्या वर्षी सोलापूर शहरामध्ये डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा झाला आणि असं पुण्यामध्येही होणं शक्य आहे. मग प्रश्न असा आहे की पुण्यामध्ये तीन-साडेतीन हजार गणेश मंडळं आहेत. त्यातली काही गणेश मंडळं रजिस्टर्ड आहेत, बाकीची अनरजिस्टर्ड आहेत. पण या गणेश मंडळांचं काय? ही गणेश मंडळं म्हणजे राजकीय पक्षांच्या छोट्या-मोठ्या शाखा आहेत. त्यांना सगळं फंडिंग असेल किंवा त्या मंडळांसाठी हे राजकीय पक्ष अशा काळामध्ये बरीच मदत करतात. मग ही मंडळं राजकीय पक्षांना निवडणुकीच्या काळामध्ये त्याची परतफेड करतात. तर हे असं सगळं गणित आहे.

त्यामुळे सत्ताधारी मंडळी आणि विरोधातली मंडळी सावध झाली. “अरे, गणेश मंडळांनाच जर विरोध होत असेल तर हे आपल्या अंगाशी येईल,” असं त्यांना वाटलं आणि मग ती आक्रमक झाली. तिथे लोक आक्रमक झाल्यानंतर बापटांना गप्प बसावं लागलं. बापटांना पोलिसांनी संरक्षण दिलं, पालिकेच्या सभागृहातून बाहेर काढलं. त्यानंतर बापटांच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्यात आली. पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे तर असं म्हणाले की, “या बापटांना कोण काळं कुत्रं विचारत नाही, गल्लीतलं काय त्यांचं ऐकायचं?” अर्थात मला काय कल्पना नाही; पण निवडणुकीत मतं मागताना कदाचित त्याची तपासणी आधी धीरज घाटे करत असतील की गल्लीतलं कुत्रं कोणाला विचारतं. त्याच लोकांची मतं मागावीत, ज्यांना गल्लीतलं कुत्रं विचारतं. ज्यांना गल्लीतलं कुत्रं विचारत नाही, त्यांची मतं मागू नयेत, असं काही क्रायटेरिया त्यांच्या तपासणीमध्ये आहे का, माहीत नाही.