भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला थेट दिली सत्ता सोडण्याची धमकी.. 'ते' नेमकं प्रकरण काय?

मिथिलेश गुप्ता

मनसेच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप हे KDMC मध्ये आमनेसामने आले आहेत. मनसेला बाहेर काढा, अन्यथा युती तोडा असा अल्टिमेटमच भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला दिला आहे.

ADVERTISEMENT

bjp directly threatens shindes shiv sena with quitting power what exactly is kdmc matter
भाजप वि. शिवसेना
Google CTA

कल्याण: मनसे आणि भाजपमधील राजकीय वादाचे पडसाद आता थेट कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महायुतीच्या सत्ता-समीकरणावर उमटू लागले आहेत. मनसेला सत्तेतून बाहेर काढावे, अन्यथा महायुतीतून बाहेर पडण्याची भूमिका घ्यावी, अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना याबाबत अधिकृत पत्र दिल्याने KDMC मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

दरम्यान, आज (3 सप्टेंबर) कल्याणमध्ये भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत सर्व सदस्यांनी एक निर्णय घेऊन वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात आले असल्याची माहिती भाजपचे उपमहापौर राहुल दामले यांनी दिली आहे. आता आम्ही सत्तेत राहायचे की विरोधी बाकावर बसायचे हा निर्णय वरिष्ठ घेतील असेही राहुल दामले म्हणाले.

अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यात आल्याच्या वादानंतर भाजपने मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आमच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. मनसेसोबत सत्तेत बसणार नाही, असा स्पष्ट इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. भाजपच्या गटनेता कार्यालयातील बैठकीतही मनसेसोबतची युती तोडली नाही, तर विरोधी बाकांवर बसण्याची भूमिका मांडण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे KDMC मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सत्तासमीकरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपचे शिवसेनेला पत्र

भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना पत्र देत मनसेला सत्तेच्या समीकरणातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. महायुती कायम ठेवायची असेल तर मनसेसोबतची आघाडी तातडीने संपवावी, अशी भाजपची ठाम भूमिका असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटानेही आक्रमक पलटवार केला आहे.