मालाडमध्ये भरधाव कारचा कहर; महिलेचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी
मालाडमध्ये भरधाव कारच्या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले. आरोपीवर BNS कलम 105 लागू करून पुन्हा अटक करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: मालाड परिसरात भरधाव कारमुळे झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोपीवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी करत भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 105 लावण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मालाडमधील एस. व्ही. रोड आणि मामलेदारवाडी रोड जंक्शन येथे हा भीषण अपघात झाला. MH-02-GJ-2722 क्रमांकाच्या एमजी विंडसर कारने भरधाव वेगात प्रथम एका ऑटो रिक्षाला धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या कारने आणखी दोन ऑटो रिक्षा आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालकासह एकूण सहा जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोपी चालकाला अटक
मालाड पोलिसांनी तातडीने कार चालक 70 वर्षीय कृष्णा शांताराम चमनकर याला ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर त्याची शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
