मनोजदादांनी फक्त आदेश द्यावा..मुंबईला जाऊ; महिलांचा सरकारला थेट इशारा

मुंबई तक

07 Sep 2026 (अपडेटेड: 07 Sep 2026, 09:30 AM)

maratha protest : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा नववा दिवस असून प्रकृती खालावत असल्याने अंतरवाली सराटीत महिला आंदोलक भावूक झाल्या. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाण्यासाठी तयार असल्याचा इशारा महिलांनी सरकारला दिला आहे.

maratha protest

maratha protest

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मनोज जरांगे दादांनी फक्त आदेश द्यावा..मुंबईला जाऊ

point

महिलांचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange Patil hunger strike : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र आणि भावनिक होताना दिसत आहे. मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी (दि.6) नववा दिवस होता. गेल्या नऊ दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली आहे. त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजातील महिला भावूक झाल्या. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी आलेल्या महिलांच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले.

हे वाचलं का?

हेही वाचा : कराड: दोन वर्षांपासून आईसोबत मित्राचे प्रेमसंबंध, साथीदाराच्या मदतीने बॉयफ्रेंडला संपवलं

“आमच्या दादांची एवढी कसोटी कोणीच बघू नये”

पिंपळवंडी येथून आलेल्या एका महिला आंदोलकाने भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या. “आमच्या सगळ्या बहिणींचं आयुष्य कमी हो आणि आमच्या भावाला भेटो,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. जरांगे पाटील यांची प्रकृती पाहवत नसल्याचं सांगत त्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. “आमच्या दादांची एवढी कसोटी कोणीच बघू नये,” असं म्हणत त्यांनी सरकारला लवकर निर्णय घेण्याचं आवाहन केलं. नऊ दिवस उपाशी राहणं ही साधी गोष्ट नसल्याचं सांगत त्यांनी सरकारने दुर्लक्ष केल्यास महिला आक्रमक भूमिका घेतील, असा इशाराही दिला.

हेही वाचा : नवी मुंबई पोलीस अधिकाऱ्याने संपवलं जीवन, सुसाईड नोेटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे

सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची भावना

छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या एका महिला आंदोलकानेही सरकारला हात जोडून सर्व मागण्या मान्य करण्याची विनंती केली. मागण्या मान्य न झाल्यास 12 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असेल आणि मोठ्या संख्येने महिला घराबाहेर पडतील, असं त्यांनी सांगितलं. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी सरकारला सवाल केला. दहीहंडीच्या कार्यक्रमांचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाच्या हातावर वारंवार आश्वासनांची तुरी दिली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, आंदोलनस्थळी उपस्थित महिला आंदोलकांनी जरांगे पाटील यांनी फक्त आदेश द्यावा, आम्ही मुंबईला जाण्यासाठी तयार आहोत, अशी भूमिका मांडली. “दादांनी आम्हाला एकदा सांगावं, मुंबईला निघा, आम्ही जशा आहोत तशा मुंबईला येणार,” असं एका महिला आंदोलकाने सांगितलं. तसेच मराठा समाजातील महिलांनी घरात न थांबता आंदोलनासाठी बाहेर पडावं, असं आवाहनही करण्यात आलं. जरांगे पाटील यांच्या प्रकृतीकडे पाहून महिला आंदोलक भावूक झाल्या असून, सरकारने लवकरात लवकर पावलं उचलून मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा मुंबईला जाण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा थेट इशारा मराठा बांधव आणि भगिनींनी सरकारला दिला आहे.