पुणे: गणेशोत्सव डीजेमुक्त असावा, ध्वनीप्रदूषणावर कठोर नियंत्रण आणावे आणि सण उत्सव कालसुसंगत पद्धतीने साजरे व्हावेत, अशी भूमिका मांडल्यानंतर पुण्यातील विद्यानंद बापट हे महाराष्ट्रभर चर्चेत आले आहेत. त्यांच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत असतानाच त्यांच्यावर हल्लाही झाला. त्यानंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबई Tak ने विद्यानंद बापट यांच्याशी सविस्तर संवाद साधला. त्यांच्या भूमिकेमागील विचार, आंदोलनाची दिशा आणि टीकाकारांना दिलेली उत्तरे जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
विद्यानंद बापट यांची Exclusive मुलाखत, जशीच्या तशी..
प्रश्न: सर्वप्रथम मुंबई Tak मध्ये तुमचं स्वागत. काल तुमच्यावर हल्ला झाला. त्यानंतरही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का? आणि पुढे ही चळवळ कशी नेणार आहात?
विद्यानंद बापट: हो, मी पूर्णपणे ठाम आहे. कारण मी जे मुद्दे मांडले आहेत, त्यावर आजपर्यंत कुणीही तार्किक प्रतिवाद केलेला नाही. गेल्या सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीनंतर या मागणीला संघटित स्वरूप मिळू लागले आहे. विविध स्तरांवर अनेक नागरिक एकत्र येत आहेत. सध्या मी अनेक माध्यमांना मुलाखती देण्यात व्यस्त आहे. मात्र, लवकरच या चळवळीची ठोस रूपरेषा जाहीर करू.
प्रश्न: कालचा हल्ला, त्यानंतरच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या आई-वडिलांनी व्यक्त केलेली चिंता... या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता?
विद्यानंद बापट: जेव्हा मुद्द्यांना उत्तर देता येत नाही, तेव्हा काही लोक हिंसेचा मार्ग स्वीकारतात. मला वाटतं ही केवळ प्रसिद्धी मिळवण्याची धडपड आहे. पण अशा हल्ल्यांमुळे चळवळी थांबत नाहीत; उलट त्या अधिक वेगाने पुढे जातात.
इतिहासात आपण सॉक्रेटिस, जिओर्डानो ब्रुनो, गॅलिलिओ किंवा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची उदाहरणे पाहिली आहेत. दाभोलकर ज्या कायद्याकरिता अनेक वर्षे लढले, तो त्यांच्या हत्येनंतरच मंजूर झाला. त्यामुळे अशा घटनांमुळे माझा निर्धार अधिकच मजबूत होतो.
प्रश्न: सोलापूर आणि नागपूरमध्ये डीजेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मग पुण्यातच एवढा विरोध का होत असल्याचं तुम्हाला वाटतं?
विद्यानंद बापट: माझ्या मते पुण्यात अजूनही एक प्रकारचा अवास्तव अभिमान आहे. ध्वनीप्रदूषण ही पूर्णपणे मानवनिर्मित आणि शंभर टक्के नियंत्रणात आणता येणारी समस्या आहे. अशा प्रश्नात पुणेच पुढाकार घेईल, अशी अपेक्षा होती. पण तसं झालेलं नाही.
आता तरी पुणेकरांनी बदल स्वीकारावा. संस्कृतीच्या नावाखाली विकृतीचं समर्थन होऊ नये. नागरिकांना ध्वनीप्रदूषणापासून मुक्त करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
प्रश्न: तुमच्याविरोधात काही संघटनांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही धार्मिक भावना दुखावता. यावर तुमचं उत्तर काय?
विद्यानंद बापट: 'धार्मिक भावना दुखावल्या' ही संकल्पनाच मला हास्यास्पद वाटते. श्रद्धा म्हणजे शरीराचा एखादा अवयव नाही की तो दुखावला जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघानेही अनेक देशांना 'ब्लास्फेमी'सारखे कायदे रद्द करण्याची शिफारस केली आहे. भारतातही या विषयावर गंभीर चर्चा व्हायला हवी. एखाद्या सार्वजनिक प्रश्नावर टीका करणं म्हणजे धर्माचा अपमान नव्हे.
प्रश्न: लोकांचं म्हणणं आहे की गणेशोत्सव हा सार्वजनिक उत्सव आहे. तो रस्त्यावरच साजरा व्हायला हवा. तुम्हाला काय वाटतं?
विद्यानंद बापट: सार्वजनिक म्हणजे फक्त रस्ता असा अर्थ होत नाही. सार्वजनिक सभागृहं, मैदाने, सांस्कृतिक केंद्रे ही देखील सार्वजनिक जागाच आहेत.
गणेशोत्सव सुरू झाला, तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. त्या काळी वाहतूक नव्हती, लाऊडस्पीकर नव्हते, लोकसंख्या कमी होती. आज शहरांचा विस्तार झाला आहे, वाहने वाढली आहेत, वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे उत्सवही काळानुसार बदलले पाहिजेत.
आमचा उत्सवाला विरोध नाही. आमची मागणी एवढीच आहे की ध्वनीप्रदूषण आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही, अशा बंदिस्त किंवा योग्य जागांवर उत्सव साजरे व्हावेत.
प्रश्न: तुमच्यावर असा आरोप केला जातो की तुम्ही स्वतःला नास्तिक म्हणता. मग हिंदू सणांविषयी बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय?
विद्यानंद बापट: हा पूर्णपणे दिशाभूल करणारा युक्तिवाद आहे. मी जे मुद्दे मांडतो, ते एका नागरिकाच्या भूमिकेतून मांडतो. माझी वैयक्तिक श्रद्धा किंवा नास्तिकता हा या चर्चेचा विषय नाही. माझ्या भूमिकेला अनेक धार्मिक आणि उत्सवप्रेमी लोकही समर्थन देत आहेत.
लोकशाहीत धर्मस्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण त्याचबरोबर शांततेत जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि मुक्तपणे फिरण्याचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा आहे. या दोन गोष्टींची गल्लत होता कामा नये.
प्रश्न : डीजे आणि साऊंड सिस्टीमच्या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. डीजे बंद झाल्यास त्यांचं काय?
विद्यानंद बापट: रोजगार हा महत्त्वाचा विषय आहे. मात्र, केवळ रोजगार आहे म्हणून कोणत्याही गोष्टीचं समर्थन करता येत नाही.
पूर्वी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगवरही अनेक लोकांचा रोजगार होता. पण ती अमानवी प्रथा असल्याने बंद करण्यात आली आणि त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. हाताने ओढायच्या रिक्षा, टांगे अशा अनेक गोष्टी काळानुसार बंद झाल्या.
तसंच, जर एखादा व्यवसाय इतरांच्या मूलभूत अधिकारांवर परिणाम करत असेल, तर पर्यायी रोजगाराची व्यवस्था करणे हा योग्य मार्ग आहे.
प्रश्न: हा बदल टप्प्याटप्प्याने व्हायला हवा, असं काही जणांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं?
विद्यानंद बापट: अनेक वर्षांपासून "पुढच्या वर्षी पाहू" असंच सांगितलं जात आहे. पीओपी गणेशमूर्तींच्या प्रश्नावरही हेच घडलं.
चांगल्या गोष्टीसाठी उशीर करण्याचं कारण नसतं. "शुभस्य शीघ्रम" हेच माझं मत आहे. जे योग्य आहे, ते शक्य तितक्या लवकर लागू झालं पाहिजे.
प्रश्न: तुमच्या आई-वडिलांनीही तुमच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्याशी याबाबत चर्चा झाली का?
विद्यानंद बापट: हो, त्यांनी काळजी व्यक्त केली. ते स्वाभाविक आहे. पण मी आता स्वतंत्रपणे माझे निर्णय घेतो. त्यांनी काळजी व्यक्त केली असली, तरी माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.
प्रश्न: तुमच्या भाषेचं आणि शब्दांच्या निवडीचं प्रचंड कौतुक होत आहे. इतकी नेमकी मांडणी कशी करता?
विद्यानंद बापट: भाषा हे साधन आहे, साध्य नाही.
समोरच्या व्यक्तीपर्यंत विचार अचूक पोहोचण्यासाठी नेमके शब्द वापरणं आवश्यक असतं. माझा उद्देश माझं व्यक्तिमत्त्व मोठं करणं नाही; माझा उद्देश विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हा आहे.
प्रश्न: सोशल मीडियावर तुमचे मीम्स तयार होत आहेत. अनेकजण तुम्हाला 'जनतेचा आवाज' म्हणत आहेत. हे पाहून काय वाटतं?
विद्यानंद बापट: मला वैयक्तिक प्रसिद्धीची अजिबात इच्छा नाही. मी मूलतः गोपनीयतेचा समर्थक आहे. मला लोकांनी ओळखावं, सतत कॅमेरे मागे लागावेत, हे मला आवडत नाही.
पण जर ही प्रसिद्धी चळवळीला बळ देत असेल आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरत असेल, तर त्यापासून दूर जाणार नाही.
प्रश्न: अनेक पुणेकर तुम्हाला आशेचा किरण मानत आहेत. या चळवळीला आता अधिक मोठं स्वरूप देण्याचा विचार आहे का?
विद्यानंद बापट: हो, महापालिकेतील बैठकीनंतर अनेक नागरिक खुलेपणाने बोलू लागले आहेत.
पूर्वी अनेकजण समस्या अनुभवत होते, पण सार्वजनिकपणे बोलत नव्हते. आता ते पुढे येत आहेत. जर माझी भूमिका या प्रक्रियेला चालना देत असेल, तर त्याचं समाधान आहे.
प्रश्न: ढोल-ताशांबाबत तुमची भूमिका काय आहे? अनेकांच्या मते ती पुण्याची संस्कृती आहे.
विद्यानंद बापट: माझा ढोल-ताशांना विरोध नाही. मात्र, त्यांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे.
पूर्वी मनोरंजनाची साधनं मर्यादित होती. त्यामुळे भजन, कीर्तन, ढोल-ताशा हे लोकांच्या मनोरंजनाचं माध्यम होतं. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. टीव्ही, इंटरनेट, मोबाईल, यूट्यूब यांसारखी अनेक साधनं उपलब्ध आहेत.
ढोल-ताशा ही रणवाद्यं आहेत. त्यांचा आवाज स्वाभाविकपणे मोठा असतो. त्यामुळे त्यांची प्रॅक्टिस किंवा सादरीकरण साऊंडप्रूफ बंदिस्त जागांमध्ये व्हावं. ज्यांना ते पाहायचं आहे ते तिथे जाऊन आनंद घेऊ शकतात आणि इतर नागरिकांनाही त्रास होणार नाही. हा सर्वांसाठी फायदेशीर (Win-Win) पर्याय आहे.
प्रश्न: पोलीस आयुक्तांनी डेसिबलची मर्यादा ठरवली आहे. त्यानुसार नियम पाळले गेले तर तुम्ही समाधानी आहात का?
विद्यानंद बापट: माझ्या मते प्रश्न फक्त डेसिबलचा नाही. उघड्यावर लाऊडस्पीकर वापरण्यालाच मर्यादा असायला हव्यात. डेसिबल मोजणं व्यवहारात कठीण असतं. आवाज क्षणाक्षणाला बदलतो.
१९८३ पासून विविध समित्या आणि न्यायालयीन प्रक्रियांमध्येही उघड्यावर लाऊडस्पीकरच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे हा नवीन मुद्दा नाही. आता या विषयावर ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
प्रश्न: तुमच्यावर असा आरोप होतो की तुम्ही फक्त गणेशोत्सवाबद्दल बोलता. इतर धर्मांच्या सणांमध्येही डीजे वाजतात. त्याबाबत तुमची भूमिका काय?
विद्यानंद बापट: माझा विरोध कोणत्याही एका धर्माला नाही. ध्वनीप्रदूषण कोणत्याही धर्माच्या, जातीच्या किंवा सणाच्या नावाखाली होत असेल, तर माझा त्याला समान विरोध आहे.
गणेशोत्सवाचा उल्लेख अधिक होतो कारण तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. पण माझी भूमिका सर्वांसाठी समान आहे.
प्रश्न: पुढे ही चळवळ कशी पुढे नेणार आहात?
विद्यानंद बापट: गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. पूर्वी नागरिक समस्या अनुभवत होते, पण बोलत नव्हते. आता ते उघडपणे भूमिका मांडत आहेत. या सर्वांना एकत्र आणून या चळवळीला संघटित स्वरूप देण्याचं काम सुरू आहे. लवकरच त्याची स्पष्ट रूपरेषा जाहीर केली जाईल.
प्रश्न: हल्ल्यानंतर पोलीस संरक्षण मिळालं आहे. त्यानंतर काही बदल झाला का?
विद्यानंद बापट: फक्त सुरक्षेची व्यवस्था वाढली आहे. पण माझ्या विचारांत किंवा निर्धारात कोणताही बदल झालेला नाही. आजही माझा आग्रह तोच आहे माझ्या मुद्द्यांना तार्किक उत्तर द्या. हिंसा हा कोणत्याही प्रश्नाचा मार्ग नाही.
प्रश्न: शेवटी, तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल?
विद्यानंद बापट: उत्सव जरूर साजरे करा. परंतु इतरांच्या मूलभूत अधिकारांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या.
संस्कृती जपताना काळानुसार आवश्यक बदल स्वीकारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. माझा विरोध सणांना नाही; ध्वनीप्रदूषण, वाहतुकीतील अडथळे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाला आहे.
लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात. पण त्यावर उत्तरही विचारांनीच दिलं पाहिजे, हिंसेने नाही.
ADVERTISEMENT












