Avinash Jadhav Interview : दहीहंडी उत्सवाच्या बदलत्या स्वरुपावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये महिलांच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जात असून, काही ठिकाणी सादर झालेल्या नृत्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. राजकीय नेत्यांच्या व्यासपीठांवर अशा प्रकारचे कार्यक्रम होत असल्याने सण आणि तो साजरा करण्याची पद्धत याबाबत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या दहीहंडीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम नसल्याचं सांगत, दहीहंडी हा सण आणि परंपरा टिकवण्यासाठी असावा, असं त्यांनी म्हटलं.
ADVERTISEMENT
'दहीहंडीला गर्दी जमवण्यासाठी जाहिरात किंवा नृत्यांगना बोलावण्याची गरज नाही'
अविनाश जाधव यांनी सांगितलं की, त्यांनी 2016 मध्ये दहीहंडी सुरू केली. दहीहंडीच्या थरांवर आणि वयावर मर्यादा आल्याच्या काळात हा सण टिकवण्यासाठी राज ठाकरे यांच्या आदेशाने दहीहंडी सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या दहीहंडीची सुरुवात लहान मुलांच्या जिम्नॅस्टिकच्या कार्यक्रमाने होते. विविध गोविंदा मंडळांमधील खेळाडूंना व्यासपीठावर संधी दिली जाते. हे खेळाडू दोन महिने सराव करतात आणि दहीहंडीच्या दिवशी थर लावतात. आपल्या दहीहंडीला गर्दी जमवण्यासाठी जाहिरात किंवा नृत्यांगना बोलावण्याची गरज नसल्याचंही जाधव यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : Personal Finance: पगार मिळाल्यानंतर 3 दिवसांत पैसे संपतात? यामागे मानसशास्त्र काय?
"वर्गणी मागणाऱ्या गोविंदा मंडळांकडून त्या गोष्टी लिहून घेणार"
महिलांच्या नृत्याच्या कार्यक्रमांवर बोलताना जाधव यांनी अशा प्रकारचे नृत्य आपल्या संस्कृतीचा भाग नसल्याचं म्हटलं. अशा कार्यक्रमांसाठी लाखो रुपये खर्च होत असल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, ज्या गोविंदा पथकांसाठी दहीहंडी आयोजित केली जाते, त्यांना तुलनेने कमी पैसे मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या वर्षी आपल्या दहीहंडीसाठी वर्गणी मागणाऱ्या गोविंदा मंडळांकडून, ज्या व्यासपीठावर महिला अशा प्रकारे नृत्य करतात तिथे थर लावणार नाही, असं लिहून घेण्याचा विचार असल्याचंही जाधव यांनी सांगितलं. अशा कार्यक्रमांचा तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा : शिवेंद्रसिंह राजे यांचा 'तो' फोटो व्हायरल, सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
दहीहंडी उत्सवात ग्लॅमर आणि सेलिब्रिटींचा वाढता वापर यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आपल्या दहीहंडीत केवळ दहीहंडीचे थर, खेळाडू आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर असल्याचं जाधव यांनी सांगितलं. महाराष्ट्र गीतावर मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात आणि त्यातूनही उत्साह निर्माण होतो, असं त्यांनी म्हटलं. पुढील वर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत यासाठी अभियान राबवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच आयोजक आणि नेत्यांनी समाजासमोर आदर्श ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असं जाधव यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT












