Maratha Reservation : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून आरक्षण दिले जाईल, असा शब्द दिल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. या फोनवर सात ते आठ मिनिटे चर्चा झाल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, दिलेला शब्द आता पाळला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास 12 सप्टेंबरनंतर मुंबईत, आझाद मैदान किंवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे चित्र आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सुनेनं केला उद्योगपती सासऱ्याचा गेम, खतरनाक प्लॅन बनवूनही सापडली, काय घडलं?
मनोज जरांगे पाटलांच्या 3 मागण्या कोणत्या?
जरांगे पाटील यांच्या प्रमुख तीन मागण्यांपैकी पहिली मागणी हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आले असल्यास त्याच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी त्यांची मागणी आहे. दुसरी मागणी 58 लाख नोंदींच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्याची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधून काढलेल्या या 58 लाख नोंदींच्या आधारे मराठा समाजाला आरक्षणाचे लाभ आणि कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे. तिसरी आणि महत्त्वाची मागणी ‘सगेसोयरे’च्या अंमलबजावणीची आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करून कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावर पात्र नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे.
हेही वाचा : ‘ऑपरेशन टायगर’च्या दिशेने शिंदेसेनेची वाटचाल; ठाकरेंच्या 16 नगरसेवकांवर टांगती तलवार
'सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अद्याप एकमत नाहीच'
या मागण्यांवरून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही. त्यांच्या आंदोलनाच्या सुरुवातीपासून सरकारच्या वतीने अनेक नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील आमदार प्रसाद लाड, मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह इतर नेत्यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन चर्चा केली आहे. मंत्री गिरीश महाजन आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातही सगेसोयरेच्या मागणीवर दीर्घ चर्चा झाली होती. मात्र, या चर्चांनंतरही उपोषण मागे घेण्यास जरांगे पाटील यांनी नकार दिला आहे. याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मात्र, आता आंदोलन पुढे जात असताना त्यांचा टीकेचा रोख पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वळल्याचे दिसत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचे दिवस वाढत असताना मराठा आंदोलकही आक्रमक होताना दिसत आहेत. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि नांदेड या भागांत मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात पुरुषांसोबत महिला आणि मुलांचाही सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे. जालन्यात धुळे-सोलापूर महामार्ग रोखण्यात आला, तर नांदेडमध्येही मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात रोष व्यक्त केला. हिंगोलीमध्ये काही मराठा आंदोलक पाण्यात उतरून आपली भूमिका मांडताना दिसले. त्यामुळे एकीकडे जरांगे पाटील यांचे उपोषण आणि दुसरीकडे विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. 12 सप्टेंबरनंतर मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने आता सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चेतून काही मार्ग निघतो का, आंदोलन थांबते का किंवा पुन्हा मुंबईच्या दिशेने आंदोलनाची वाटचाल होते का, याकडे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












