कल्याणः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह पाच आरोपींविरोधात तब्बल 1834 पानी आरोपपत्र कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर रमेश म्हात्रेंसह पाचही आरोपींना कल्याणच्या जलदगती न्यायालयात न्यायाधीश एन. पी. वसाडे यांच्या समोर हजर करण्यात आले.
ADVERTISEMENT
कोर्ट 3 महिन्यात देणार निकाल?
आज या प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली असून, आरोपींच्या वकिलांनी आरोपपत्राची प्रत देण्याची मागणी केली आहे. 15 सप्टेंबरपासून ट्रायल सुरू होणार असून, तीन महिन्यांत निकाल देण्याचे न्यायालयाचे उद्दिष्ट असल्याची माहिती आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि मेडिकल स्टाफला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यासह पाच आरोपींविरोधात 1834 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे, रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय करंडे आणि साधना करंडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर शुक्रवारी रमेश म्हात्रेंसह पाचही आरोपी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले.
या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात न्यायाधीश एन. पी. वसाडे यांच्या समोर झाली. आज प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी 1834 पानी आरोपपत्राची प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली.
आरोपीच्या वकिलांच्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरपासून या प्रकरणातील ट्रायल सुरू होणार आहे. तसेच प्रकरणाचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी न्यायालयाकडून सुमारे तीन महिन्यांत निकाल देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, 6 जुलै रोजी एका महिला रुग्णावर वेळेत उपचार झाले नसल्याचा आरोप करत रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी शास्त्रीनगर रुग्णालयात गर्दी केली होती. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला.
या घटनेनंतर पोलिसांनी डॉक्टर, नर्स आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे तपासाचा भाग बनवण्यात आले. या सर्व तपासाच्या आधारे पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, आत्मसमर्पण केल्यानंतर रमेश म्हात्रे यांना कल्याणच्या आधारवाडी मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी त्यांना काही कठोर अटींसह जामीन मंजूर केला. जामिनाच्या अटींनुसार म्हात्रे आणि अन्य तीन पुरुष आरोपींना महाराष्ट्राबाहेर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या म्हात्रे आणि अन्य तीन पुरुष आरोपी गोव्यातील अंजुना परिसरात राहत असल्याची माहिती आहे. आरोप निश्चित होईपर्यंत त्यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यास मनाई आहे. तर महिला आरोपी साधना करंडे या अटकेनंतरपासून आधारवाडी कारागृहात आहेत.
आता 1834 पानी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ट्रायलमध्ये नेमके काय घडते आणि तीन महिन्यांच्या उद्दिष्टानुसार निकाल लागतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












