Pune MPSC Aspirant Kidnapping : पुण्यातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या सदाशिव पेठेत काल (10 सप्टेंबर) रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजेच्या सुमारास एका एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली. चिमण्या मारुती गणपती मंचाजवळून ही घटना घडली असून, अभ्यास करून लायब्ररीतून बाहेर पडलेल्या एका तरुणाला स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या काही जणांनी जबरीने उचलून नेले. या घटनेने पुण्यात अभ्यास करणाऱ्या राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
मारहाण करुन गाडीत कोंबले
अपहृत तरुण हा मूळचा बारामतीचा असून तो गेली साडेतीन ते चार वर्षांपासून पुण्यात MPSC परीक्षेची तयारी करत आहे. काल रात्री परीक्षा पुढे ढकलल्यामुळे इतर विद्यार्थी रूमवर गेले असताना, हा तरुण पावणेबाराच्या सुमारास अभ्यास करून खाली आला. गाडीवर बसण्याच्या तयारीत असतानाच, आधीच दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला, त्याला गळ्याला धरून मारहाण केली आणि बळजबरीने गाडीत कोंबले. त्या वेळी त्याने ओरडून इतर विद्यार्थ्यांना पोलिसांना 112 नंबरवर फोन करण्यास सांगितले.
हे ही वाचा : 'जरांगेंना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथे येईल..' जरांगे आणि दिपके यांच्या भेटीत काय घडलं?
आरोपीचा दावा काय?
तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, हे अपहरण वैयक्तिक संशयातून आणि असुरक्षिततेच्या भावनेतून करण्यात आले होते. संशयित आरोपी सागर बोराडे पाटील (अलका टॉकीज जवळील 'पाटीलवाडा' हॉटेलचा मालक) आणि त्याच्या साथीदारांनी या तरुणाला सिंहगड रोडच्या दिशेने नेले. आरोपीचा असा दावा होता की, पीडित तरुण त्याच्या मैत्रिणीला मेसेज करतो. मात्र, पीडित तरुणाने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ती मुलगी त्याच्या हॉस्टेलच्या खालील मजल्यावर राहत असल्याने केवळ 5-6 महिन्यांची कॅज्युअल ओळख होती आणि गेल्या 2-3 महिन्यांपासून त्यांचा कोणताही संपर्क नव्हता, असा खुलासा तरुणाने केला आहे.
हे ही वाचा : समजून घ्या : रोहित पवार यांना काँग्रेसचा काय सल्ला? म्हणून राष्ट्रवादीसमोर अट?
कशी झाली सुटका?
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी आरोपीच्या फोनवर संपर्क साधून कठोर कारवाईचा इशारा देताच घाबरलेल्या आरोपीने मारहाण थांबवून पीडित तरुणाला सोडले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. भररस्त्यात घडलेल्या अशा गुंडगिरीमुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.
ADVERTISEMENT












