'जरांगेंना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथे येईल..' जरांगे आणि दिपके यांच्या भेटीत काय घडलं?
अभिजीत दिपके मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी जरांगेंच्या मागण्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे सरकारला आवाहन केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मी पण मुंबईला जाईन..'
जरांगे आणि दिपके यांच्या भेटीत काय घडलं?
Abhijit Dipke Meets Manoj Jarange, गौरव साळी : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे मागील 13 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. आज (11 सप्टेंबर) जरांगे यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस आहे. उपोषणाच्या चौदाव्या दिवशी दिपके यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दिपके यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करत त्यांना तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले. तसेच मुंबईला जाण्याविषयीदेखील दिपकेंनी भाष्य केले.
सरकार निर्दयी आहे
मनोज जरांगे 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या मागण्यांची सरकारने अजून विचारपूस केलेली नाही, अशी खंत यावेळी दिपके यांनी व्यक्त केली. सरकार निर्दयी आहे, असं म्हणत सरकारने लोकांना वाऱ्यावर सोडलेले आहे, अशी टीकाही दिपके यांनी केली. सरकारने मुलांना जर चांगले शिक्षण, चांगली नोकरी दिली असती तर मनोज जरांगे यांना उपोषणाची वेळ आली नसती, असंही दिपके म्हणाले.
हे ही वाचा : समजून घ्या : रोहित पवार यांना काँग्रेसचा काय सल्ला? म्हणून राष्ट्रवादीसमोर अट?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आवाहन
दिल्लीत सोनम वांगचुक यांना 26 दिवस उपाशी ठेवले होते, तसेच जरांगे यांना पण 26 दिवस उपाशी ठेवायचे आहे का? असा संतप्त सवाल दिपके यांनी सरकारला केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीत यावं आणि मनोज जरांगे यांच्याशी बोलावलं, त्यांच्या मागण्या ऐकाव्या, अशी अपेक्षा दिपके यांनी व्यक्त केली आहे. सरकार अपयशी ठरले त्यामुळे मनोज जरांगे यांना उपोषणाला बसावे लागले, असं म्हणत सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या ऐकाव्या आणि समजून घ्याव्या आणि या वर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी दिपके यांनी केली आहे.
हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : आधी मुसळधार, नंतर चिंता वाढणार? परतीच्या पावसाचा अंदाज काय?
...तर पूर्ण महाराष्ट्र इथे येईल
जे समाजासाठी लढत आहे त्यांच्याशी बोलायला सरकार तयार नाही, असं म्हणत मनोज जरांगे खूप मोठे आहेत, त्यांना जर हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथे येईल, असा इशाराही दिपके यांनी सरकारला दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आमचे समर्थन आहे, मी पण त्यांच्यासोबत मुंबईला जाईन, असंही दीपके यांनी म्हटलंय.
