BJP formed an alliance with the Congress : अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपदावर आपला उमेदवार विराजमान केल्यानंतर आता सत्तेची गणिते अधिकच बदलली आहेत. सर्वाधिक 27 नगरसेवक असूनही शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याच्या उद्देशाने भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यासोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ची स्थापना केली आहे. या नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. या आघाडीत भाजपचे 14, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे 4 आणि 1 अपक्ष असा एकूण 31 नगरसेवकांचा समावेश आहे. नगराध्यक्षासह ही संख्या 32 वर जाते. अंबरनाथ नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
ADVERTISEMENT
निवडणूक निकालानंतर शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, नगराध्यक्षपद भाजपच्या पदरी पडले. त्यानंतर शिंदेसेनेसह सत्ता स्थापन करण्याऐवजी भाजपने स्वतंत्र भूमिका घेत ‘भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन’ हा मुद्दा पुढे करत अंबरनाथ विकास आघाडी नोंदणीकृत केली. ही आघाडी शिंदेसेनेसाठी आगामी काळात मोठी अडचण ठरू शकते.
नव्या राजकीय समीकरणाचा अर्थ काय?
अंबरनाथच्या निवडणुकीदरम्यान नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिंदेसेना यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला होता. या लढतीत भाजपने भ्रष्टाचाराचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता. शिंदेसेनेतील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने उघड विरोध दर्शवला होता. त्यामुळे सत्तेत त्यांच्या सहभागाबाबत भाजपची भूमिका नकारात्मक होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी शिंदेसेनेऐवजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी नव्या आघाडीला स्वीकृत नगरसेवकांची संख्या अधिक मिळणार असून, विविध समित्यांवरही या आघाडीचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : मुंबई: स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून सिक्योरिटी गार्डची आत्महत्या! कांदिवली परिसरात खळबळ...
राजकीयदृष्ट्या शिंदेसेना आणि भाजप यांची युती नैसर्गिक मानली जाते. त्यामुळे स्थानिक पातळीवरही दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने काँग्रेससोबत युती केल्याने ही घडामोड शिंदेसेनेकडून ‘अनपेक्षित आणि धक्कादायक’ असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
अभद्र युती केल्याची टीका, शिंदेसेनेचे आमदार भडकले
“शिंदेसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती असताना स्थानिक पातळीवर वेगळी भूमिका घेण्यात आली. भाजपने काँग्रेससोबत अभद्र युती केली आहे,” अशी टीका आमदार डॉ. बालाजी किणीकर (शिंदेसेना) यांनी केली.
भाजप नेत्यांनी काय म्हटलं?
“अंबरनाथमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. शहर भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त ठेवण्याच्या वचनबद्धतेतूनच अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आहे,” असे भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुळे पाटील यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
“शहरवासीयांना अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवर एकत्र आलो आहोत. द्वेषाचे राजकारण बाजूला ठेवून अंबरनाथच्या शाश्वत विकासासाठी आम्ही काम करू,” असे मत काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी व्यक्त केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
विद्यार्थीनीला वसतीगृहात जबरदस्ती नमाज पढायला लावला, पालघरमधील धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल
ADVERTISEMENT











