पोरीसाठी बापाने भाजपला सोडलं, महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याचा राजीनामा प्रचंड चर्चेत!

मुलगी ठाकरे गटातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सांवत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:00 AM • 06 Nov 2025

follow google news

गोकुळ कांबळे, रत्नागिरी: रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. चिपळूण येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीत सावंत यांनी राजीनामा सादर केला. रवींद्र चव्हाण हे बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सावंत यांच्या या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. सावंत यांच्या राजीनाम्यामागे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रमुख कारण असल्याचे समजते.

हे वाचलं का?

नेमका का दिला सावंतांनी राजीनामा?

त्यांच्या कन्या शिवानी माने (सावंत) या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांच्या सून आहेत. त्यामुळे राजेश सावंत यांच्यासमोर राजकीय आणि कौटुंबिक धर्मसंकट उभे राहिले होते. जर ते जिल्हाध्यक्ष पदावर कायम राहिले असते, तर त्यांना महायुतीच्या नगराध्यक्ष उमेदवाराचा प्रचार करावा लागला असता.

अशा स्थितीत त्यांना स्वतःच्या मुलीच्या विरोधात प्रचार करावा लागला असता, ही परिस्थिती त्यांच्या दृष्टीने नैतिकदृष्ट्या अवघड होती. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा देत कौटुंबिक व राजकीय संघर्ष टाळण्याचा मार्ग निवडला.

राजेश सावंत यांनी दिला भाजप जिल्हाधक्ष पदाचा राजीनामा

सावंत यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आपल्या भूमिकेबद्दल स्पष्ट माहिती दिली असून, “पक्षाच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये आणि कौटुंबिक गैरसमजही टाळावेत,” या विचाराने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या वर्तुळात सावंत हे शिस्तप्रिय आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर काही प्रमाणात धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आता ते भाजपमध्ये राहून नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतात का, की कन्या शिवानी माने यांच्या राजकीय मोहिमेबाबत तटस्थ भूमिका घेतात? हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल. 

राजेश सावंत यांच्या या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सावंत यांचा राजीनामा हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून, तो कौटुंबिक आणि पक्षनिष्ठा यांच्या सीमेवर घेतलेला संवेदनशील निर्णय असल्याचे मानले जात आहे.

    follow whatsapp