CJP समर्थकाच्या वडिलांना बेदम मारहाण, काही तासातच मृत्यू; पाहा काय म्हणाले भाजपचे मुख्यमंत्री

मुंबई तक

• 11:19 PM • 17 Aug 2026

पश्चिम बंगालच्या बांकुड्यात CJP समर्थकाच्या घरावर हल्ला करण्यात आला. यावेळी समर्थकाच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

cjp supporter father killed bankura 8 arrested bjp connection

मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी

Google CTA

कोलकाता: पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्यात कॉकरोच जनता पार्टी (CJP) समर्थकाच्या घरावर झालेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या CJP समर्थकाच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

हे वाचलं का?

CJP आंदोलनातून परतल्यानंतर घडली घटना

बांकुडा जिल्ह्यातील इंदासच्या करिगुंडा गावातील रहिवासी शेख अब्दुल हफीज हे कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक आहेत. 19 जुलै रोजी ते दिल्लीत झालेल्या CJPच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर 27 जुलै रोजी ते गावात परतले.

पक्षाच्या निर्देशानुसार 13 ऑगस्ट रोजी हफीज स्थानिक करिगुंडा पश्चिमपाडा प्राथमिक शाळेत शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काशीनाथ डे यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी हफीज यांच्यासोबत मारहाण केल्याचा आरोप आहे.

घरात घुसून हल्ला

यानंतर रात्री काही उपद्रवींनी हफीज यांच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोरांकडे लाठी, लोखंडी रॉड आणि इतर लोखंडी वस्तू असल्याचा आरोप आहे.

हफीज यांनी घरात पळून जाऊन स्वतःचा बचाव केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचे वडील शेख मोहम्मद मफीक यांना लक्ष्य करत बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गंभीर जखमी मफीक यांना इंदास ब्लॉक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी त्यांना बर्धमान मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याच रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

10 ते 15 जणांविरोधात तक्रार, 8 जण अटकेत

मृतकाची पत्नी हसीना बेगम यांनी इंदास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत 10 ते 15 हल्लेखोरांचा उल्लेख करण्यात आला आहे.

पोलिसांनी आतापर्यंत 8 संशयितांना अटक केली असून त्यांना विष्णुपूर उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींची चौकशी सुरू असून, हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

‘BJPचा कोणताही संबंध नाही’; शुभेंदू अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

या घटनेवर पश्चिम बंगालमधील भाजपचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नबन्ना येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी या प्रकरणात BJPचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील आरोपी गुन्हेगार आहेत आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

केंद्रीय मंत्री सुकांत मजूमदार यांनीही या घटनेची FIR दाखल करून पोलिसांनी चौकशी करावी, असे म्हटले. ही घटना स्थानिक वादातून घडली असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

राज्यमंत्री अग्निमित्रा पॉल यांनीही BJP कोणत्याही चुकीच्या कृत्याला संरक्षण देणार नसल्याचे स्पष्ट केले. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

राजकीय कनेक्शनवरून चर्चेला उधाण

CJP समर्थकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने या घटनेला राजकीय रंग मिळाला आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकारमधील भाजप नेत्यांनी या घटनेशी पक्षाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण आणि सर्व आरोपींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.