PM Narendra Modi red fort speech : लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित करताना भारताच्या प्रगतीचा वेग थांबवता येणार नसल्याचा संदेश दिला. “आपण आता रुकू शकत नाही”, असे सांगत त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाने अधिक वेगाने पुढे जाण्याची गरज व्यक्त केली. भारत जगाच्या मागे राहू इच्छित नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने इंधनाच्या नव्या क्षेत्राला स्पर्श केला असून देशात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरू झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही जगातील सर्वात लांब आणि ताकदवान हायड्रोजन ट्रेन असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून भारत 2047 च्या लक्ष्याच्या दिशेने सातत्याने पुढे जात असल्याचे मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : आश्रमशाळेत सापाचा सतत वावर, मुख्याध्यापक बोलू देईना, मुंबई Tak ला थेट रोखण्याचा प्रयत्न
संकटाच्या काळातही भारताने परिस्थितीचा सामना केला - मोदी
गेल्या दशकभरात देशाने कोरोना महामारी, युद्धजन्य परिस्थिती आणि पश्चिम आशियातील तणावासारख्या अनेक संकटांचा सामना केल्याचे मोदी यांनी सांगितले. या काळात भारताला घाबरवण्यासाठी अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या, असा दावा त्यांनी केला. कोविडच्या काळात लस मिळणार नाही, लोक वाचणार नाहीत, तसेच पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांचा तुटवडा निर्माण होईल, अशा चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गेल्या 10 ते 12 वर्षांतील नियोजित तयारीमुळे संकटाच्या काळातही भारताने परिस्थितीचा सामना केला, असे मोदी म्हणाले. आज देशात गॅस, पेट्रोल आणि युरिया उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. युरियाच्या जागतिक किमतीचा उल्लेख करताना, जगात एका पोत्याची किंमत तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचली असली तरी भारतीय शेतकऱ्यांना ते 300 रुपयांत दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डीएपीची जागतिक बाजारातील किंमत पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचली असून शेतकऱ्यांना ते 1350 रुपयांत दिले जात असल्याचेही मोदी म्हणाले.
हेही वाचा : महाजन... मलई आणि बरंच काही! 'त्या' घोटाळ्याची कागदपत्रं मुंबई Tak वर
'स्थिर सरकार, सशक्त लोकशाही, मजबूत न्यायव्यवस्था आणि संविधान ही भारताची सामर्थ्ये'
आत्मनिर्भरतेचा मंत्र भारतासाठी अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे मोदी यांनी सांगितले. जगातील देशांनी स्वतःच्या संसाधनांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असून पेट्रोल, डिझेल, खत, औषधे, तंत्रज्ञानातील चिप्स आणि भूभागाचेही ‘वेपनायझेशन’ होत असल्याचे त्यांनी म्हटले. अशा परिस्थितीत भारताने गेल्या दहा वर्षांत आत्मनिर्भरतेच्या दिशेने केलेली तयारी महत्त्वाची ठरली असल्याचे ते म्हणाले. भारताचे जागतिक स्तरावरील प्रोफाइल वाढत असून स्थिर राजकीय जनादेश, स्थिर सरकार, सशक्त लोकशाही, मजबूत न्यायव्यवस्था आणि संविधान ही भारताची सामर्थ्ये असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 नंतर जवळपास 40 देशांसोबत मुक्त व्यापार करार होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. भारतीय उत्पादनांनी जागतिक बाजारपेठेत पोहोचले पाहिजे, असे सांगताना वस्त्रोद्योग, यंत्रसामग्री, औषधे आणि सी-फूड क्षेत्राचा त्यांनी उल्लेख केला.
2047 च्या विकसित भारताचे लक्ष्य मजबूत पायावर उभे असल्याचे मोदी म्हणाले. शतकाचा एक चतुर्थांश भाग पूर्ण झाला असून पुढील एक चतुर्थांश काळ अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. “आता आपण थांबू शकत नाही, आपली गती थांबू शकत नाही, आपली दिशा निश्चित झाली आहे,” असा संदेश त्यांनी दिला. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कामाची पद्धत, कार्यसंस्कृती, विचार आणि कामाचा वेग बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच-सात दशकांत जी कामे झाली नाहीत, ती पुढील पाच-सात वर्षांत करण्याचे लक्ष्य ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. देशाची युवा शक्ती, नौजवान, माता-भगिनी, शेतकरी आणि कामगार यांच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त करत त्यांनी सुधारणांचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली. सरकार, समाज, उद्योग, उत्पादक आणि शेतकरी या सर्वांनी आपल्या पारंपरिक व्यवस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT












