BJP MLA Akshay Kardile Controversial Speech : अहिल्यानगर (अहमदनगर) महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राहुरीचे नवनियुक्त भाजप आमदार अक्षय कर्डिले यांचा एक संतापजनक आणि चिथावणीखोर भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जमलेल्या जनसमुदायासमोर बोलताना कर्डिले यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यांनी मारण्याची आणि मुंडके छाटण्याची भाषा केल्याने त्यांच्या वक्तव्यावरून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर हे भाषण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आमदार कर्डिले यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : "नरेंद्र मोदी रात्री झोपत नाहीत, आम्ही त्यांना वेड लावू... आणि ते चाणक्य.." राहुल गांधी का झाले एवढे आक्रमक?
धीरज परदेशी यांचा खून कशामुळे झाला?
धीरज परदेशी हे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेचे वायरमन युनुस शेख यांनी धीरज आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे कामासाठी जाण्यास सांगितले होते. काम सुरू असताना कब्रस्तान परिसरातून धीरज यांच्या ओरडण्याचा आवाज त्यांच्या सहकाऱ्यांना आला. कैलास मुळे घटनास्थळी पोहोचले असता मेहराज सैय्यद, सिराज सैय्यद, मुस्तकीम सैय्यद आणि युनुस सैय्यद हे धीरज यांना लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे त्यांना दिसले. धीरज मदतीसाठी आरडाओरड करत होते, मात्र मारहाण सुरूच होती. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले. जखमी धीरज यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : शिवसेना सुनावणी: आमदार अपात्रतेवरून सिब्बलांनी घेरलं, सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद जसाच्या तसा..
भगवा टिळा लावल्यामुळे मारहाण करण्यात आल्याचा आरोप
धीरज यांच्या मृत्यूची बातमी शहरात पसरल्यानंतर घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी नगर बंदचे आवाहन केले. त्यानंतर शहरातील बहुतांश दुकाने बंद झाली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. धीरज यांच्या अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवरही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धीरज यांच्या पत्नीने त्यांच्या पतीला भगवा टिळा लावल्यामुळे मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला असून, न्यायाची मागणी केली आहे. धीरज यांच्या मृत्यूनंतर महानगरपालिका कर्मचारी संघटनेनेही काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कामावर जाताना कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळत नसल्याचा आरोप संघटनेने केला असून, सुरक्षा मिळेपर्यंत कामावर जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर शहरातील वातावरण दोन ते तीन दिवस तणावपूर्ण राहिले असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अद्याप कायम असल्याचे दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अक्षय कर्डिले आणि आमदार संग्राम जगताप यांच्या भाषणांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल मारण्याची आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे सांगण्यात आले आहे. धीरज परदेशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी दोन्ही आमदार बोलताना दिसत आहेत. दरम्यान, धीरज यांच्या हत्या प्रकरणात सुरुवातीला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारादरम्यान धीरज यांचा मृत्यू झाल्यानंतर खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून तपासादरम्यान आणखी आरोपी समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT












