नांदेड: शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेड येथे गुरुवारी कृपाणने हल्ला करण्यात आला. नांदेडमधील गुरुद्वारा माता साहिब देवन जी मुकट परिसरात दुपारी सुमारे 1.45 वाजता हा प्रकार घडला. निहंग वेशात आलेल्या व्यक्तीने बादल यांच्यावर हल्ला केला. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.
ADVERTISEMENT
हल्लेखोर कोण?
या प्रकरणात पोलिसांनी 62 वर्षीय जसपाल सिंह याला ताब्यात घेतले आहे. तो मूळचा पुण्याचा रहिवासी असून, काही काळ पुणे न्यायालयात वकील म्हणून काम करत होता. मागील दोन वर्षांपासून तो नांदेडजवळील मुगत येथील माता साहिब गुरुद्वारात सेवा करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
हल्ल्याची नेमकी पार्श्वभूमी काय?
सुखबीर बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागील कारणाची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी या घटनेनंतर त्यांच्या जुन्या राजकीय आणि धार्मिक वादांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेषतः डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्याशी संबंधित प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र, राम रहीम प्रकरणाचा आणि नांदेडमधील हल्ल्याचा थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा सध्या समोर आलेला नाही.
हे ही वाचा>> 'निवडणूक आयोगाने "तो" निर्णय आधीच ठरवलेला', ठाकरेंच्या वकिलाचा कोर्टात मोठा आरोप
काय आहे राम रहीम प्रकरण?
2007 मध्ये गुरमीत राम रहीम यांनी पंजाबमधील सलाबतपुरा येथे एका कार्यक्रमात केलेल्या वेशभूषेवरून शीख समाजात मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर श्री अकाल तख्त साहिबकडून राम रहीम यांच्याविरोधात आदेश जारी करण्यात आला.
2015 मध्ये राम रहीम यांना श्री अकाल तख्त साहिबकडून माफी देण्यात आल्याने पंजाबच्या शीख राजकारणात मोठी खळबळ उडालेली. या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन अकाली सरकार आणि सुखबीर सिंह बादल यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालेले. आरोप होता की, राम रहीम यांना माफी मिळण्याच्या प्रक्रियेत सरकार आणि अकाली नेतृत्वाचा प्रभाव होता.
हे ही वाचा>> दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर जरांगेंना वापरायला दिली, टीकेनंतर मालक समोर, सगळं बोलले...
या माफीच्या समर्थनार्थ जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी SGPC कडून सुमारे 90 लाख रुपये खर्च झाल्याचा मुद्दाही वादाचा भाग बनला होता. मात्र मोठ्या विरोधानंतर ही माफी मागे घेण्यात आली.
अकाल तख्तने सुखबीर बादल यांना शिक्षा का सुनावली?
30 ऑगस्ट 2024 रोजी श्री अकाल तख्त साहिबने सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक गैरवर्तनाच्या प्रकरणात तनखैया घोषित केले होते. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये त्यांना विविध गुरुद्वारांमध्ये सेवा करण्याची धार्मिक शिक्षा देण्यात आली.
राम रहीम यांना कथित माफी मिळवून देण्यात भूमिका बजावल्याचा आरोप, 2015 मधील बेअदबीच्या घटनांवर योग्य कारवाई न केल्याचे आरोप तसेच कोटकपूरा आणि बहिबल कलां पोलीस गोळीबाराच्या प्रकरणातील भूमिकेवरूनही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. बहिबल कलां गोळीबारात दोन शीख आंदोलकांचा मृत्यू झाला होता.
सुखबीर बादलांवर याआधीही हल्ला
नांदेडमधील हल्ला हा सुखबीर बादल यांच्यावरील दुसरा मोठा हल्ला असल्याचे वृत्त आहे. डिसेंबर 2024 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे त्यांचा जीव वाचला होता.
हल्ल्याचा राम रहीमशी थेट संबंध आहे का?
सध्या याचे उत्तर नाही, असेच म्हणावे लागेल. नांदेड हल्ल्याची नेमकी प्रेरणा किंवा हल्लेखोराचा उद्देश अधिकृतपणे स्पष्ट झालेला नाही. राम रहीम, 2015 मधील माफी, बेअदबी आणि पोलीस गोळीबार या जुन्या वादांमुळे या प्रकरणाची राजकीय आणि धार्मिक पार्श्वभूमी चर्चेत आली आहे. मात्र या जुन्या वादांचा आणि गुरुवारी झालेल्या हल्ल्याचा थेट संबंध असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही पुष्ट पुरावे उपलब्ध नाहीत.
ADVERTISEMENT












