"तुझे वडील संतोष देशमुख यांना किती...", CM फडणवीस यांचं वैभवीला भावनिक पत्र, काय शब्द दिला?

वैभवी बारावीमध्ये शिकत होती आणि तिला वडिलांच्या हत्येनंतर बारावीची परीक्षा द्यावी लागली. त्यानंतर मिळालेल्या या यशामुळे वैभवी तीचं राज्यभरातून कौतुक होतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे यांनीही वैभवीचं फोन करुन कौतुक केलं.

Mumbai Tak

मुंबई तक

06 May 2025 (अपडेटेड: 06 May 2025, 09:02 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वैभवी देशमुखचं घवघवीत यश, राज्यभरातून कौतुक

point

वैभवी देशमुखला देवेंद्र फडणवीस यांचा फोन

point

देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीला पाठवलेल्या पत्रात काय म्हटलं?

Vaibhavi Deshmukh 12th Result : सहा महिन्यांपूर्वी बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं राज्य हळहळलं होतं.  संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्यायाच्या लढ्यात संपूर्ण देशमुख कुटुंब संघर्ष करत होतं. यामध्ये संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख सुद्धा प्रत्येक ठिकाणी बापासाठी लढताना दिसत होती. तर दुसरीकडे याच काळात वैभवीचं शिक्षणाच्या दृष्टीनं आयुष्यातलं महत्वाचं वर्ष होतं. वैभवी बारावीमध्ये शिकत होती आणि तिला वडिलांच्या हत्येनंतर बारावीची परीक्षा द्यावी लागली. मात्र, एवढ्या मोठ्या घटनेनंतर खचून न जाता वैभवीने परीक्षा दिली आणि तब्बल 85 टक्के मिळवले. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maharashtra Board 10th Result 2025: बारावीचा निकाल तर लागला आता 10 वीचा निकाल 'या' तारखेपर्यंत होणार जाहीर?

वैभवी देशमुखच्या या यशामुळे ते राज्यभरातून कौतुक होतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे यांनी लगेचंच वैभवीचं फोन करुन कौतुक केलं. वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मंडळींनी वैभवीचं कौतुक केलं. काल संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी देशमुखचं कौतुक करत तिला भावनिक पत्र लिहिलं. या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीचं कौतुक केलंच, मात्र तिच्या संघर्षाचाही उल्लेख त्यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

"अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत बारावीच्या परीक्षेत अतिशय चांगले यश तू संपादन केलेस, तुझे अतिशय मनापासून अभिनंदन. मला याची जाणीव आहे की, तुझ्या आजच्या या यशाचा तुझे वडील स्व. संतोष देशमुख यांना किती आनंद झाला असता. पण, दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. पण, तुझ्या पाठिवर कौतुकाची थाप आण संपूर्ण महाराष्ट्र देतोय. 85.33 टक्के गुण संपादन करुन तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींसमोर आदर्श स्थापित केला आहेस. तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. तू अशीच प्रगती करीत रहावी, भविष्यात यशाचे अनेक टप्पे गाठावेत, यासाठी आमच्या शुभेच्छा सदैव तुझ्यासोबत आहेतच. तुझ्या या प्रवासात आमची भक्कम साथ आणि पाठिंबा सदैव तुझ्या सोबत असेल. भावी वाटचालीसाठी तुला अनेकानेक शुभेच्छा!"

दरम्यान, तसंच त्यांनी काल वैभवीला फोनही केला होता. यावेळी वैभवीनं आपल्या वडिलांना फक्त न्याय मिळावा ही आशा व्यक्त केली.

    follow whatsapp