Eknath Shinde on Manoj Jarange Patil, दिल्ली : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात केलेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिल्याची चर्चा सुरू असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला होता. या आरोपावर एकनाथ शिंदे यांनी आजच खुलासा करावा, असं थेट आव्हानही त्यांनी दिलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आज (दि.21) दिल्लीतून या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली. 500 कोटी रुपये कोणाला दिलेही नाहीत आणि कोणी घेतलेही नाहीत, असं सांगत शिंदे यांनी जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : मुंबईची खबर : लोकलमध्ये फोनचा मोठा आवाज पडणार महागात, काय आहे नवा नियम? जाणून घ्या सविस्तर
500 कोटी रुपये देण्याचा किंवा घेण्याचा प्रश्नच नाही - एकनाथ शिंदे
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या आरोपांवर आमचे प्रवक्ते बोलत आहेत. 500 कोटी रुपये देण्याचा किंवा घेण्याचा प्रश्नच नाही. जरांगे यांनी ज्या आधारावर हे आरोप केले आहेत, त्याची शहानिशा करून बोलायला हवं होतं. त्यांच्याकडे या आरोपांचे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत, असं आव्हान शिंदे यांनी दिलं. एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यांच्या कामाची पद्धत सर्वांना माहिती आहे. एकनाथ शिंदे हे नाव घेतलं की बातम्यांमध्ये हेडिंग होतं, असंही त्यांनी म्हटलं. अनेक लोक असं करत असल्याचा दावा त्यांनी केला.
हेही वाचा : आरोपीची गर्लफ्रेंड राधा अन् तिच्यासोबत बबिता... टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी नवी खळबळजनक माहिती
मनोज जरांगे पाटील यांनी समाजासाठी काम करावं, मात्र त्याचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर करू नये, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. जरांगे समाजाचं काम करत होते, म्हणून आपण मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं, असं ते म्हणाले. कुणबी प्रमाणपत्र, आरक्षण आणि गेल्या 60 वर्षांत राबवण्यात न आलेल्या अनेक योजना आपल्या सरकारने राबवल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्रात मराठा समाजातील अनेक नेत्यांनी नेतृत्व केलं, मात्र त्यांनी हे काम केलं नाही, असं शिंदे म्हणाले. कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला न्याय दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जरांगे समाजासाठी काम करत असल्यामुळे त्यांनाही मदत केली, असं सांगत त्यांनी समाजाचं काम सुरू ठेवण्याचं आवाहन केलं.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावेळी नाशिकच्या कुंभमेळ्याबाबतही माहिती दिली. राष्ट्रपतींना कुंभमेळ्याचं निमंत्रण देण्यासाठी आपण दिल्लीत गेलो होतो, असं त्यांनी सांगितलं. 31 ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणासाठी उपस्थित राहावं, असं निमंत्रण राष्ट्रपतींना देण्यात आलं असून त्यांनी ते स्वीकारलं आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली. हा अतिशय मोठा सोहळा असून त्यासाठी लाखो लोक उपस्थित राहणार असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा परिसर मंगलमय होईल. राष्ट्रपतींनी या सोहळ्याला उपस्थित राहावं, अशी लोकांचीही इच्छा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT












