CJP Protest Delhi : दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनादरम्यान टॉलस्टॉय मार्गावर आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि 'रॅपिड ॲक्शन फोर्स'ने (RAF) अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यापूर्वीही या मार्गावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये दोनदा चकमक झाली होती. सध्या पोलीस परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत असून सुरक्षारक्षक घटनास्थळी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
ADVERTISEMENT
इंस्टाग्रामचा गैरवापर
दरम्यान, जंतर-मंतरवर सुरू असलेल्या 'CJP'च्या आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वपूर्ण माहिती दिली. पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून जंतर-मंतरवर हे आंदोलन सुरू असून, यादरम्यान सोशल मीडियाचा, विशेषतः 'इन्स्टाग्राम'चा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जात आहे.
डीपफेक व्हिडिओ
दिल्ली पोलिसांनी आरोप केला आहे की, अनेक दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत, ज्याचा थेट परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून चालवले जाणारे 400 हून अधिक अकाऊंट्स ओळखून ते ब्लॉक करण्यात आले आहेत. याशिवाय सोनम वांगचुक आणि सैन्याच्या तैनातीशी संबंधित एआय (AI) तसेच 'डीपफेक' व्हिडिओही पसरवले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
सत्यता पडताळून पहा
या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष टास्क फोर्सची (STF) स्थापना केली आहे. सोशल मीडियावर 20 जुलैच्या हिंसेत एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र तो पूर्णपणे खोटा असून ती तरुणी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच एका राजकीय नेत्याने रात्रकालीन पोलीस कारवाईबाबतचा बनावट व्हिडिओ शेअर केला होता, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगत नागरिकांना कोणतीही बातमी शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले आहे.
ADVERTISEMENT












