सरपंच मंगेश साबळेंना तडीपार करण्याची नोटीस पोलिसांनी का जारी केली?

मुंबई तक

18 Aug 2026 (अपडेटेड: 18 Aug 2026, 01:22 PM)

mangesh sable : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले मंगेश साबळे यांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस बजावली आहे. खंडणी, गुंडगिरी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

mangesh sable

mangesh sable

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मंगेश साबळेंना तडीपार करण्याची नोटीस पोलिसांनी का जारी केली?

point

Mangesh Sable तडीपार होणार? पोलिसांनी नोटीस का बजावली?

mangesh sable : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच असलेल्या मंगेश साबळे यांना पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर खंडणी, गुंडगिरी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपांशी संबंधित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरनगर आणि फुलंब्री या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरोधात आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'आधी भांडी घासते, मग पाय दाबते...' नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले, 11 वर्षानंतर काय घडलं?

मंगेश साबळेंचे पैसे उधळल्याचे आंदोलनही चर्चेत आले

मंगेश साबळे हे सोशल मीडियावरही सक्रिय असून, विविध आंदोलनांमधून ते चर्चेत राहिले आहेत. बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना वेठीस धरणे आणि शासकीय कामात अडथळा आणणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. यापूर्वी त्यांनी तहसील कार्यालयात पैशांची माळ घेऊन जाऊन पैसे उधळल्याचे आंदोलनही चर्चेत आले होते. पोलिसांनी 8 ऑगस्ट रोजी त्यांना तडीपारीची नोटीस बजावली होती. स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही त्यांनी पोलिसांना कायदेशीर खुलासा केलेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : 'आधी भांडी घासते, मग पाय दाबते...' नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले, 11 वर्षानंतर काय घडलं?

सूडातून कारवाई केली जात असल्याचा मंगेश साबळेंचा आरोप 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगेश साबळे यांनी कायद्याचा आदर करून आपली बाजू मांडणे अपेक्षित होते. मात्र, ते समाजमाध्यमांवर वक्तव्य करत आहेत. ते हजर न राहिल्यास एकतर्फी अहवाल सादर करून तडीपारीची कारवाई केली जाऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, मंगेश साबळे यांनी ही कारवाई सूडातून केली जात असल्याचा आरोप केला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असल्यामुळे आपल्याला जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईविरोधात राज्यभर भीक मागो आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मंगेश साबळे हे चर्चेत आले होते. त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर स्वतःची गाडी जाळल्यामुळे त्यांच्याबद्दल समाजामध्ये सहानुभूती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि त्यांना जवळपास दीड लाख मते मिळाली होती. त्यांच्या निवडणूक लढतीमुळे काँग्रेसचे कल्याण काळे विजयी झाले आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मंगेश साबळे यांना जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा चेहरा मानले जाते. आता पोलिसांनी बजावलेल्या दोन वर्षांच्या तडीपारीच्या नोटिशीला ते कायदेशीर उत्तर देतात का आणि त्यांच्यावर प्रत्यक्षात तडीपारीची कारवाई होते का, याकडे लक्ष लागले आहे.