'आधी भांडी घासते, मग पाय दाबते...' नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले, 11 वर्षानंतर काय घडलं?

मुंबई तक

पाय दाबायला उशीर केल्यामुळे ठाण्यातील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला जिवंत जाळले. पत्नीची चार दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु होती. यावेळी तिने पोलिसांना दोन जबाब दिले. यापैकी कोणत्या जबाबानुसार न्यायालयाने शिक्षा सुनावली, हे प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घ्या सविस्तर.

ADVERTISEMENT

Thane Crime
Thane Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आधी भांडी घासते, मग पाय दाबते...

point

नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले

point

11 वर्षानंतर काय घडलं?

Thane Crime : ठाणे सत्र न्यायालयाने 11 वर्षांनंतर एका अत्यंत धक्कादायक प्रकरणात निकाल दिला आहे. केवळ पाय दाबण्यास उशीर झाल्याच्या रागातून पत्नीला जिवंत जाळणाऱ्या 38 वर्षीय सुभाष वाघमारे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय, न्यायालयाने दोषीवर एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायमूर्ती आर. डी. सावंत यांनी पीडितेचा मृत्यूपूर्व दिलेला दुसरा जबाब पूर्णपणे सत्य मानून हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आणि या क्रूर घटनेत तब्बल 11 वर्षांनी न्याय दिला.

आधी भांडी घासते, मग पाय दाबते

ही हृदयद्रावक घटना 9 मे 2015 रोजी घडली होती. सुभाष आणि त्याची पत्नी वैशाली हे ठाण्याजवळील घोडबंदर गावात एका भाड्याच्या घरात राहत होते. त्या रात्री सुभाषने वैशालीला आपले पाय दाबण्यास सांगितले. मात्र, आधी भांडी घासून घेते आणि मग पाय दाबते, असे उत्तर वैशालीने दिले. केवळ एवढ्याशा कारणावरून सुभाषने स्वतःवरील नियंत्रण गमावले आणि तिला अनेक कानशिलात लगावून बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर वेदनेने विव्हळत वैशाली पलंगावर जाऊन बसली असता, रागाच्या भरात सुभाषने तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि माचिस पेटवून तिला आग लावली.

हे ही वाचा : मोदी 'दिमागी नक्सल' म्हणाले अन् इथे नवा पक्ष तयार झाला!

मृत्यूआधी दिला जबाब

आगीत गंभीररीत्या भाजलेल्या वैशालीला तात्काळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर 13 मे 2015 रोजी तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सरकारी पक्षाने आपला दावा सिद्ध करण्यासाठी न्यायालयात एकूण 10 साक्षीदार हजर केले. या संपूर्ण खटल्यात वैशालीने दिलेले दोन वेगवेगळे मृत्यूपूर्व जबाब अत्यंत निर्णायक आणि कळीचे ठरले.

हे ही वाचा : रस्ता नसल्यानं बायकोचा जीव गेला, ग्रामस्थांसह नवऱ्यानं काय केलं बघाच!

दोन वेगळे जबाब का?

वैशालीने 10 मे रोजी दिलेल्या पहिल्या जबाबात पोट आणि कानाच्या असह्य वेदनांमुळे आपणच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते, ज्याचा बचाव पक्षाने पुरेपूर फायदा घेत आत्महत्येचा युक्तिवाद केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी 11 मे रोजी विशेष कार्यकारी अधिकारी आणि पोलिसांसमोर तिने आपला दुसरा जबाब नोंदवला. रुग्णालयात पती उपस्थित असल्याने त्याच्या भीतीपोटी आपण आधी खोटे बोलल्याचे तिने स्पष्ट केले आणि पतीच्या क्रूर कृत्याचा पर्दाफाश केला. न्यायालयाने तिच्या दुसऱ्या जबाबावर विश्वास ठेवत आत्महत्येचा दावा फेटाळून लावला आणि सुभाष वाघमारे याला पत्नीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा निश्चित केली.