एक कोटीच्या विम्यासाठी गरोदर पत्नीचा घात! आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवऱ्याचा भयानक डाव
जबलपूर मधील एका पतीने विम्यासाठी आपल्या पत्नीची हत्या केली आहे. मित्रासोबत मिळून त्याने हा भयंकर कट रचला. या कामासाठी त्यांनी मारेकरीही नेमले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एक कोटीच्या विम्यासाठी गरोदर पत्नीचा घात!
आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवऱ्याचा भयानक डाव
Crime News : एका महिलेच्या क्रूर हत्यनेनंतर संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका पतीने आपल्या तीन महिन्यांच्या गरोदर पत्नीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 4 सप्टेंबरच्या रात्री रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळलेल्या कविता चौधरी (वय 30) हिचा मृत्यू सुरुवातीला रस्ता अपघात वाटत होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांच्या तांत्रिक तपास व कॉल डेटा विश्लेषणातून या अपघातामागील हत्येचा कट उघड झाला. मध्य प्रदेशातील जबलपूर परिसरातील ही घटना आहे.
मित्राच्या मदतीने रचला कट
या हत्येचा मुख्य सूत्रधार मृत महिलेचा पती प्रयास पांडे हा असून, तो न्यायालयात नोटरी आणि स्टॅम्प व्हेंडर म्हणून काम करतो. प्रयासने त्याचा साथीदार मानसिंग लोधी याच्या मदतीने हा कट रचला. कट रचताना पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून एका महिन्यापूर्वी विक्रम अहिरवार नावाच्या चालकाच्या नावावर पिकअप वाहन भाड्याने घेण्यात आले होते. घटनेच्या दिवशी प्रयासने पत्नी कविताला एका कामाच्या बहाण्याने त्या मार्गावर पाठवले आणि आधीच घात लावून बसलेल्या तीन मारेकऱ्यांनी तिच्या स्कूटीला जोरदार धडक देऊन गाडी तिच्या डोक्यावरून घालवून तिची निर्घृण हत्या केली.
हे ही वाचा : ग्यानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज ठाकरे बंधूंचा एल्गार! राज-उद्धव ठाकरे एकत्र, मुंबईत महामोर्चा
1.15 कोटी रुपयांच्या विम्यासाठी पत्नीचा घेतला जीव
पोलीस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, या हत्येमागे सुमारे 1.15 कोटी रुपयांचा विमा क्लेम हडपण्याचा उद्देश होता. कायद्याचे ज्ञान असल्यामुळे प्रयासने अपघाती मृत्यू दाखवून विम्याची रक्कम मिळवण्याचा डाव आखला होता. या कामासाठी मारेकऱ्यांना वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये 60 ते 70 हजार रुपये आधीच देण्यात आले होते. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर 2024 मध्ये दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता.
हे ही वाचा : पाऊस विसरा, आता उष्णतेची लाट, कुठल्या भागांना अलर्ट?
मारेकरी अटकेत, पती फरार
या प्रकरणात कारवाई करत पाटन पोलिसांनी विक्रम अहिरवार (31), धनीराम उर्फ करिया (22) आणि रामजी चौधरी (21) या तीन मारेकऱ्यांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी जप्त केली आहे. मुख्य सूत्रधार पती प्रयास पांडे आणि त्याचा साथीदार मानसिंग लोधी सध्या फरार असून, पोलीस पथके त्यांच्या शोधात विविध ठिकाणी छापे मारत आहेत.
