Manikrao Kokate : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळा प्रकरणात सुनावण्यात आलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. या संदर्भातील निकाल 16 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून पोलिसांकडून माणिकराव कोकाटे यांच्या अटकेच्या हालचालींना वेग आला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाले असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
ADVERTISEMENT
माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात यावे, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायदंडाधिकारी न्यायालयात अंजली दिघोळे यांनी हा अर्ज सादर केला होता, न्यायालय त्यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर झाले असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
दरम्यान, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या भेटीत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यानंतर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय तुम्हीच घ्यावा, असे फडणवीस यांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रोहित पवारांची टीका
आमदार रोहित पवार म्हणाले, माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे तेव्हा विलंब का केला जातोय ? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा...!
दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा, प्रकरण नेमके काय?
सुमारे 30 वर्षांपूर्वी नाशिक शहरातील हायप्रोफाईल भागात माणिकराव कोकाटे यांनी अल्प उत्पन्न गटासाठी राखीव सदनिका मिळवली होती. त्यांनी स्वतःसह त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चौघांनी कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘निर्माण व्ह्यू’ अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवल्या होत्या. या सदनिका वाटपाबाबत तत्कालीन राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास तसेच प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निकालाविरोधात कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले होते. मात्र मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
फोन कॉलवर ओळख अन् नंतर व्हिडीओ कॉलवर अश्लील बोलणं! पण, शेवटी अनपेक्षित घडलं अन्... नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT











