मुंबई : दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. प्रज्ञा सातव या उद्या म्हणजेच 18 डिसेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजी, दुर्लक्ष आणि असंतोषामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, काँग्रेसकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून पक्षनेते सतेज पाटील यांनी या चर्चांना निराधार असल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्या सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष असून विधान परिषदेच्या आमदार आहेत. 2021 साली शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मधील निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा एकदा विधान परिषदेवर त्यांची निवड झाली असून 2030 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे.
राजीव सातव कोण होते?
प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे 2014 ते 2019 या कालावधीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. मोदी लाटेतही काँग्रेसकडून निवडून येणाऱ्या मोजक्या खासदारांमध्ये त्यांचा समावेश होता. राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पंचायत समितीपासून ते लोकसभा, राज्यसभा आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरात प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. मात्र, 2021 मध्ये कोरोनामुळे त्यांचे अकाली निधन झाले आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला.
दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर काँग्रेसने अधिकृत भूमिका मांडली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, “काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आमदारकी दिली आहे. त्या असा कोणताही टोकाचा निर्णय घेतील असे वाटत नाही. ही बातमी तथ्यहीन आहे. पक्ष त्यांच्या संपर्कात आहे आणि आम्ही त्यांच्याशी संवाद ठेवणार आहोत,”
तथापि, जर प्रज्ञा सातव खरोखर भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर हा काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात राजीव सातव यांनी उभारलेला काँग्रेसचा मजबूत गड त्यांच्या निधनानंतर कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला मिळालेली ताकद, कार्यकर्त्यांशी असलेली नाळ आणि संघटनात्मक बांधणी आजही आठवली जाते. अशा पार्श्वभूमीवर प्रज्ञा सातव यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून उद्याचा दिवस राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











