मुंबई: 16 डिसेंबर 1971 हा पाकिस्तानच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. या दिवशी ढाक्यातील रामना रेस कोर्स मैदानावर पाकिस्तानी सेनेचे लेफ्टनंट जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाजी यांनी भारतीय सेनेचे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा यांच्यासमोर आत्मसमर्पणाचे दस्तऐवज स्वाक्षरी केले होते. ज्यानंतर तब्बल 93 हजार पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी बनले होते. हे इतिहासातील सर्वात मोठं आत्मसमर्पण होतं, ज्यामुळे पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगलादेशाची निर्मिती झालेली.
ADVERTISEMENT
या पराभवाने पाकिस्तान हादरून गेला होता. पराभवानंतर झुल्फिकार अली भुट्टो यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर लगेचच एका चौकशी आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे नाव हमूदुर रहमान आयोग असे ठेवण्यात आलेले, ज्याचे अध्यक्षपद पाकिस्तानचे तत्कालीन सरन्यायाधीश हमूदुर रहमान यांच्याकडे होते. आयोगाची स्थापना 1971 मध्येच झालेली. तर मुख्य अहवाल 1974 मध्ये सादर झाला होता. आयोगाने 1972 ते 1974 या काळात चौकशी केली आणि पूरक अहवालात एक विशेष प्रकरण 'नैतिक बाबी' (Moral Aspects) या नावाने समाविष्ट केले होते.
हे ही वाचा>> पुण्यातील 'या' भागात सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी चक्र फिरवली अन् झाला पर्दाफाश, असा घेतला शोध
आयोगाच्या निष्कर्षांनी पाकिस्तानी सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसलेला. आयोगाने स्पष्ट म्हटलेले की, 1971 च्या युद्धातील पराभव फक्त सैन्याच्या चुका किंवा रणनीतीच्या अपयशामुळे झालेलं नव्हतं, तर सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नैतिक पतन हे मुख्य कारण होतं. मार्शल लॉच्या काळापासून सुरू झालेल्या या नैतिक अधोगतीने जनरल याह्या खान यांच्या काळात उच्चांक गाठला होता. वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचार, दारू आणि अनैतिक जीवनात बुडाले होते, ज्यामुळे त्यांची नेतृत्व क्षमता आणि लढण्याची इच्छाशक्ती पूर्णपणे नष्ट झाली होती.
याह्या खान यांच्यावर गंभीर आरोप
आयोगाने जनरल याह्या खान यांना थेट जबाबदार ठरवले होते. ते दारूच्या व्यसनात आणि पार्ट्यांमध्ये बुडालेले होते. ढाक्यातून पराभवाच्या बातम्या येत असतानाही ते 'व्यस्त' होते. त्यांची निकटवर्तीय 'जनरल राणी' (अक्लिम अख्तर) हिचा उल्लेख आयोगात आला आहे. ती अधिकृत पदावर नसतानाही बढत्या आणि करारांवर प्रभाव टाकत होती. गायिका नूर जहाँ हिच्या वारंवार भेटींचाही उल्लेख आहे. आत्मसमर्पणाच्या रात्रीच्या पार्टीनंतर याह्या खान यांना हँगओव्हर होता, असे साक्षीदारांनी सांगितले.
हे ही वाचा>> मुख्यमंत्र्यांचं विचित्र कृत्य, भर कार्यक्रमात नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा अचानक हिजाबच खेचला अन्…
नियाजी यांच्यावर ठपका
पूर्व कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल नियाजी यांच्यावरही गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. लाहोरमधील वेश्यालयाशी संबंध, पूर्व पाकिस्तानातून पानाची तस्करी आणि लाच घेण्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. आयोगाने म्हटले की, कमांडरच्या अशा वर्तनामुळे सैनिकांचे मनोधैर्य खचले. सैनिक विचार करू लागले की, 'जर कमांडर असा असेल तर आम्ही का लढावे?' यामुळे सेनेत शिस्त आणि लढाईची भावना पूर्णपणे संपली.
आयोगाच्या अहवालातील काही महत्त्वाचे भाग
"हार फक्त सैन्याच्या चुकांमुळे झाली नाही. सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नैतिक पतन हे मुख्य कारण होते. मार्शल लॉपासून सुरू झालेली ही अधोगती याह्या खानच्या काळात अधिक होती. अधिकारी भ्रष्टाचार आणि अनैतिकतेत बुडालेले, ज्यामुळे त्यांची नेतृत्व क्षमता नष्ट झाली होती."
आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोर्ट मार्शलची शिफारस केली होती, पण भुट्टो सरकारने कोणतीही कारवाई केली नव्हती. हा अहवाल अनेक दशकं गुप्त ठेवण्यात आला होता. 2000 साली परवेझ मुशर्रफ यांच्या काळात तो जाहीर झाला होता.
काही विश्लेषकांचे मत आहे की, नैतिक पतनावर भर देऊन आयोगाने राजकीय अपयश लपवले. खरे कारण बंगाली लोकांविरुद्ध अत्याचार, निवडणुका नाकारणे आणि फुटीरतावादी चळवळ होते. तरीही, आयोगाच्या पुराव्यांनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दारू, स्त्रिया आणि भ्रष्टाचारातील बुडालेल्या जीवनाने पराभवाला मोठा हातभार लावला.
याह्या खान 1980 मध्ये आणि नियाजी 2004 मध्ये मरण पावले होते. पाकिस्तानच्या पराभवाची जबाबदारी या दोघांवर असून त्यांच्यावर कधीही खटला चालला नाही. आज 54 वर्षांनंतरही पाकिस्तान 1971 च्या पराभवाशी झुंजत आहे. हा अहवाल पाकिस्तानच्या सैन्य आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो नेतृत्वाच्या नैतिकतेची आठवण करून देतो.
ADVERTISEMENT











