राहुल गांधींना सलग दुसऱ्या दिवशीही 'त्यावर' बोलू दिलं नाही! लोकसभेतील नेमका गोंधळ काय?

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत राहुल गांधींनी सलग दुसऱ्या दिवशी मनोज नरवणेंनी केलेल्या दाव्यावर बोलण्यास सुरुवात केली. पण त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे लोकसभेत बराच गोंधळ झाला.

Mumbai Tak

मुंबई तक

• 04:28 PM • 03 Feb 2026

follow google news

नवी दिल्ली: सध्याच्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या  आत्मचरित्रावरून गोंधळ सुरू आहे. संसदेचं कामकाज सुरू होताच, विरोधी खासदारांनी वेलमध्ये घुसून प्रचंड गोंधळ घातला. गोंधाळामुळे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना डोकलाम विषयावर बोलू देण्यात आलं नाही. जेव्हा-जेव्हा राहुल गांधींनी हा विषय काढला तेव्हा-तेव्हा सत्ताधाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला. ज्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना बोलण्यास मज्जाव केला. ज्यानंतर काँग्रेस खासदारांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं.

हे वाचलं का?

राहुल गांधींनी दिला तो कागद अन्...

राहुल गांधी लोकसभेत बोलत आहेत. राहुल गांधींनी सुरुवातीला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आणि तो प्रमाणित करतात. राहुल गांधी म्हणाले की, 'हा चीन आणि पाकिस्तानशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे.' ज्यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला आणि म्हटले की, 'ते सभागृहाची दिशाभूल करत आहेत.' त्यांनी अध्यक्षांच्या बैठकीत घडलेल्या घटनेचा संदर्भ दिला आणि म्हणाले, "आम्ही येथे ऐकण्यासाठी बसलो आहोत. तो विषय वगळला पाहिजे."

हे ही वाचा>> राहुल गांधींना का आणि कशासाठी संसदेत बोलण्यापासून रोखलं? असा विषय तरी काय ज्यामुळे लोकसभेत तुफान राडा?

लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले 

राहुल गांधींनी पुन्हा नरवणे यांच्या पुस्तकासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. त्यांनी विचारले, "मला बोलू का दिले जात नाही? मी विरोधी पक्षनेता आहे, मला बोलू द्या." ते म्हणाले, "जर लेखावर आक्षेप असेल तर मी बोलणार नाही." राहुल गांधींनी चीनचा उल्लेख केला आणि सांगितले की पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिक मारले गेले. ज्यानंतर लोकसभेच्या तालिका अध्यक्षांनी राहुल गांधींना बोलण्यापासून रोखले आणि इतर सदस्यांची नावं पुकारली.

हे ही वाचा>> 'मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अमराठी महापौर', मीरा-भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीचा एल्गार

लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले कागद...

लोकसभेत राहुल गांधींना बोलण्यापासून रोखल्याने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनीही बोलण्यास नकार दिला. ज्यानंतर मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ वेलमध्ये गर्दी केली आणि अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे फेकली. या सगळ्या गोंधळामुळे कामकाज विस्कळीत झाले, त्यामुळे तालिका अध्यक्ष कृष्ण प्रसाद टेनेटी यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब केले.

खासदारांचं निलंबन

दुपारी 3 वाजता लोकसभेचे कामकाज चौथ्यांदा सुरू झाले. त्याआधी ज्या विरोधी पक्षातील खासदारांनी लोकसभेत अध्यक्षांवर कागदपत्रे फेकली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.  एकूण 9 खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी यावेळी निलंबित करण्यात आलं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उर्वरित अधिवेशनासाठी कागदपत्रे फेकणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. जो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरही विरोधी पक्षांच्या खासदारांकडून बराच वेळ गोंधळ सुरू होता. ज्यामुळे लोकसभेचं कामकाज हे उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं.

    follow whatsapp