Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांनी काल (7 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यावरुन आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या भेटीवर कडक शब्दांत टीका करताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. "मोदी महाशय या गद्दारांना चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असा धीर देत आहेत. हे लोक वॉशिंग मशीनमध्ये गेल्याने त्यांच्यावरचे इतर डाग तर धुतले गेले असतील, पण गद्दारीचा डाग मात्र धुतला जात नाही. तो डाग धुऊ शकेल असे वॉशिंग मशीन अजून तरी भाजपकडे आलेले नाही," असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. तसेच बेशरमपणाने मोदी गद्दारांना भेटत असल्याचा घणाघात ठाकरेंनी केला.
ADVERTISEMENT
'गद्दारांना बेशरमपणाने भेटून...'
देशातील तरुण आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठ्या, काठ्या आणि गोळ्या चालवल्या जात आहेत. अशा वेळी देशाचे पंतप्रधान तरुणांना भेटत नाहीत, मात्र गद्दारांना बेशरमपणाने भेटून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन देतात, असा आरोप ठाकरेंनी केला. "मी तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका" हे शब्द पंतप्रधानांनी देशातील अस्वस्थ तरुणांना सांगायला हवे होते. परंतु, ज्यांच्यावर गद्दारीचा शिक्का आहे त्यांना अशा प्रकारे संरक्षण देणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
हे ही वाचा : भाजपच्या कुठल्या मित्रपक्षाचा पाठिंबा? दिपके हसले, काय बोलून गेले?
गद्दारांनी बॉस बदलला
कोर्टात सुनावणी सुरू असतानाच ही भेट का घडवून आणली गेली, याविषयी ठाकरे यांनी शंका व्यक्त केली. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील हे वाक्य मुद्दाम बाहेर आणण्यामागचा हेतू काय, असा सवाल त्यांनी विचारला. "चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे" हा संदेश देऊन पंतप्रधान मोदी सर्वोच्च न्यायालयाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याआधी हे खासदार अमित शाह यांना भेटत असत, पण आता त्यांनी आपला 'बॉस' बदलून थेट मोदींची भेट घेतल्याचेही ते म्हणाले.
हे ही वाचा : 2023 च्या सुप्रीम कोर्ट निकालात काय होतं, ज्याचा दाखला ठाकरे अजूनही सुप्रीम कोर्टात देतात?
अमित शहा महाराष्ट्रात, शिंदे दिल्लीत
अमित शाह महाराष्ट्रात आलेले असतानाच शिंदे आणि त्यांच्या खासदारांनी दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेणे यामागे मोठा राजकीय संकेत असल्याचे ठाकरेंनी स्पष्ट केले. "भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे" हा दिलेला धमकीवजा संदेश नेमका कोणासाठी आहे, असा सवाल त्यांनी केला. हा संदेश सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे की संपूर्ण प्रशासनाला दिलेला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ADVERTISEMENT











