sanjay shirsat on beed caste hatred : बीड जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि राजकीय मतभेदांमुळे जातीय द्वेषाचे वातावरण तयार झाल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई Tak च्या चावडीवर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना बीडमधील परिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. बीडमध्ये सोशल मीडिया तसेच दैनंदिन व्यवहारांमध्येही विरुद्ध जातीच्या लोकांशी संबंध ठेवायचे नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी बीडमध्ये अनेक वर्षांपासून मराठा विरुद्ध वंजारी असा प्रकार सुरू असल्याचे थेट सांगितले. या प्रकारामागे असलेल्या राजकीय नेत्यांनाही आपण अनेक वेळा सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणासाठी या परिस्थितीचा वापर योग्य वाटत असला, तरी आता समाजात पडलेली फट खूप मोठी झाली आहे, असे शिरसाट म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'मामी, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय...' भाचा पाठ सोडेना; शेवटी घडलं भयंकर
बीडमधील जातीभेदाचे परिणाम विकासावरही झाले - संजय शिरसाट
शिरसाट यांनी बीडमधील परिस्थितीचे गंभीर परिणाम होत असल्याचेही सांगितले. एखाद्याच्या हॉटेलमध्ये जायचे नाही, त्याला शेतात कामाला ठेवायचे नाही किंवा त्याच्याकडून काही विकत घ्यायचे नाही, अशा प्रकारचे वातावरण तयार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. याचा परिणाम केवळ जिल्ह्यातील सामाजिक वातावरणावर नाही, तर बीडच्या विकासावरही झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या परिस्थितीमुळे बीड जिल्ह्याबाबत एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे आणि उद्योग येण्यासही अडथळा निर्माण होत आहे. बीड म्हटले की नकोच, अशी भावना निर्माण होऊन त्यावर पहिली फुली मारली जाते, असेही त्यांनी म्हटले. या परिस्थितीला कारणीभूत कोण, असा प्रश्न उपस्थित करताना शिरसाट यांनी राजकीय पुढाऱ्यांकडे बोट दाखवले. आपापसातील मतभेद इतक्या टोकाला नेल्याने त्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : जालना : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नंतर 7 महिने...,16 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?
बीडमधील रोजच्या घटनांकडे पाहिल्यानंतर परिस्थिती चिंताजनक - शिरसाट
बीडमधील वातावरण बदलण्यासाठी राजकारणातील समीकरणे बदलणे आवश्यक असल्याचेही संजय शिरसाट यांनी सांगितले. बीडमधील रोजच्या घटनांकडे पाहिल्यानंतर परिस्थिती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. बीडची बातमी वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर आली नाही, असे क्वचितच वाटते आणि त्यामुळे बीड शांत कसा, असे चित्र जिल्ह्याबद्दल निर्माण झाले आहे, असे त्यांनी सांगितले. हे केवळ टीका म्हणून सांगत नसून जिल्ह्यासाठी ही अत्यंत धोकादायक परिस्थिती असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. त्यानंतर बीडमधील वातावरण तयार करण्यासाठी तिकडचे नेतेच जबाबदार आहेत ना, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बीडमधील गुंडगिरी, वेगवेगळ्या व्यक्तींना ‘आका’ किंवा ‘बाका’ बनवण्याच्या प्रकाराबाबतही त्यांनी भाष्य केले.
नेमके कोण जबाबदार आहेत, यावर संजय शिरसाट यांनी एका व्यक्तीवर जबाबदारी निश्चित करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. “सगळे जबाबदार आहेत”, असे म्हणत त्यांनी ही जबाबदारी सामूहिक असल्याचे सांगितले. काही ठिकाणी ठरवलेल्या मर्यादा ओलांडल्या की मारामारी सुरू होते आणि हे एखाद्या जिल्ह्यासाठी चांगले काम नसल्याचे त्यांनी म्हटले. केवळ स्वतःच्या राजकारणासाठी परिस्थिती इतक्या टोकाला नेली, तर पुढे डोके फोडाफोडी होणारच, त्यामुळे हे थांबले पाहिजे, असे शिरसाट यांनी स्पष्ट केले. संबंधित व्यक्ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरी त्याविरोधात भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जाती-धर्माचे विष अशा पद्धतीने बाहेर पडत राहिले, तर त्याचे परिणाम महाराष्ट्रासाठी चांगले होणार नाहीत, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, असा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला.
ADVERTISEMENT












