‘दाल में काला नहीं, पूरी दाल ही...’, राहुल गांधींचा हल्लाबोल, असं का म्हणाले?

मुंबई तक

08 Aug 2026 (अपडेटेड: 08 Aug 2026, 06:23 PM)

राहुल गांधी यांनी E20 पेट्रोलवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत मोठ्या अभियानाची घोषणा केली आहे. E20 पेट्रोलमुळे वाहनांची कार्यक्षमता, मायलेज आणि ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

rahul gandhi e20 petrol video ethanol blending campaign pm modi bjp government

Rahul Gandhi E20 Petrol

Google CTA

नवी दिल्ली: देशात E20 पेट्रोलचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला लक्ष्य करत लवकरच मोठ्या प्रमाणावर अभियान छेडण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत E20 पेट्रोलबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. 

हे वाचलं का?

या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका पेट्रोल वाहनाजवळ उभे राहून E20 पेट्रोलच्या परिणामांबाबत बोलताना दिसतात. त्यांनी हा केवळ पेट्रोल किंवा वाहनांचा प्रश्न नसून सामान्य नागरिकांच्या खिशाशी संबंधित मोठा मुद्दा असल्याचं म्हटलं आहे.

‘दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली’

E20 पेट्रोलवर बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, सामान्यपणे एखाद्या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है’ असं म्हटलं जातं; मात्र E20 च्या बाबतीत ‘पूरी दाल ही काली है’, असा त्यांचा दावा आहे.

हे ही वाचा>> पैसा-पाणी: इथेनॉल मिसळलं तरी पेट्रोल मिळणार महागच!

त्यांच्या मते, देशात सध्या अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि कोणता मुद्दा आधी घ्यायचा याबाबत विरोधकांसमोर अनेक पर्याय आहेत. मात्र E20 पेट्रोलच्या प्रकरणात भ्रष्टाचाराचा मुद्दा गंभीर असल्याने तो मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधींचा नेमका आरोप काय?

राहुल गांधी यांनी E20 पेट्रोलमुळे कार, बाइक आणि स्कूटरच्या वापरकर्त्यांवर परिणाम होत असल्याचा दावा केला. विशेषतः वाहनांच्या कार्यक्षमतेवर आणि ग्राहकांच्या खर्चावर त्याचा परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, याचा थेट फटका वाहनधारकांच्या खिशाला बसत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर लवकरच व्यापक अभियान सुरू केलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

E20 Petrol म्हणजे नेमकं काय?

E20 म्हणजे पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोल असलेलं मिश्रण. भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण टप्प्याटप्प्याने वाढवलं असून 2025-26 मध्ये 20 टक्के मिश्रणाचं लक्ष्य साध्य झालं आहे. सरकारच्या मते या धोरणामुळे कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासोबतच शेतकरी आणि देशातील इथेनॉल उद्योगाला फायदा होतो.

हे ही वाचा>> E20 Janta Party कोणी बनवली? फॉलोअर्सचा अक्षरश: महापूर.. पण आता मागणी काय?

मात्र E20 च्या वाढत्या वापरामुळे जुन्या वाहनांमध्ये मायलेज, इंजिनची कार्यक्षमता आणि इंधन प्रणालीच्या दीर्घकालीन परिणामांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

E20 मुळे मायलेज कमी होतं का?

हा E20 वादातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. इथेनॉलची ऊर्जा घनता पेट्रोलपेक्षा कमी असल्यामुळे E20 मुळे वाहनाच्या fuel economy मध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वाहनांमध्ये इंधन कार्यक्षमतेत साधारण 3 ते 5 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे. मात्र सर्व वाहनांवर याचा परिणाम समान असेलच असं नाही. 

त्यामुळे ‘E20 मुळे प्रत्येक कार किंवा बाइकचं मायलेज मोठ्या प्रमाणात कमी होतं’ असा सरसकट निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.

सरकारचं म्हणणं काय आहे?

राहुल गांधींच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यापूर्वी E20 पेट्रोलबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सरकारच्या मते E20 चा वापर वैज्ञानिक चाचण्या, वाहन उत्पादक, Automotive Research Association of India (ARAI), SIAM, तेल कंपन्या आणि इतर तज्ज्ञ संस्थांच्या सल्ल्यानंतर करण्यात आला आहे.

सरकारने जुलै 2026 मध्ये जारी केलेल्या माहितीनुसार, E20 मुळे वाहनांच्या इंजिनमध्ये असामान्य झीज किंवा गंभीर compatibility समस्या निर्माण होत असल्याचे व्यापक आणि ठोस पुरावे मिळालेले नाहीत. 

सरकारच्या म्हणण्यानुसार, E20 च्या वापराबाबत केलेल्या प्रयोगशाळा चाचण्या आणि field trials मध्ये engine durability, drivability, corrosion resistance, material compatibility आणि fuel efficiency यांसारख्या बाबी तपासण्यात आल्या आहेत. 

पेट्रोल कंपन्यांनीही दिलं स्पष्टीकरण

राहुल गांधींच्या व्हिडिओनंतर E20 वरून पुन्हा चर्चा सुरू असतानाच देशातील सरकारी तेल कंपन्यांनीही E20 पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Indian Oil, BPCL आणि HPCL यांनी E20 पेट्रोल आवश्यक गुणवत्ता मानकांची पूर्तता करत असल्याचं सांगितलं आहे. देशभरातील पेट्रोलच्या नमुन्यांच्या तपासणीत गंभीर chloride contamination आढळलेलं नसल्याचं कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे.

जुन्या वाहनधारकांसाठी चिंता का?

E20 च्या चर्चेत सर्वात मोठा प्रश्न जुन्या पेट्रोल वाहनांचा आहे. नवीन वाहनांमध्ये E20 compatibility लक्षात घेऊन तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. मात्र जुन्या वाहनांमध्ये वापरलेल्या fuel-system components, calibration आणि इंजिनच्या तंत्रज्ञानानुसार परिणाम वेगळा असू शकतो.

यामुळे जुनी कार किंवा बाइक असलेल्या वाहनधारकांमध्ये मायलेज, maintenance cost आणि दीर्घकालीन वापराबाबत चिंता निर्माण झाली आहे. सरकारनेही जुन्या वाहनांमध्ये fuel economy वर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता मान्य केली आहे.

आता राहुल गांधींचं पुढचं पाऊल काय?

राहुल गांधी यांनी या विषयावर मोठ्या प्रमाणावर अभियान सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे E20 पेट्रोल हा आगामी काळात केवळ वाहनधारकांचा किंवा fuel policy चा विषय न राहता राजकीय मुद्दाही बनण्याची शक्यता आहे.

एका बाजूला सरकार E20 ला देशाची energy security, crude oil import कमी करणे आणि ethanol economy साठी महत्त्वाचं धोरण मानत आहे; तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी त्यातून ग्राहकांवरील आर्थिक परिणाम आणि कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत आहेत.