नवी दिल्ली: लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मागील दोन दिवसांपासून वेगळ्याच कारणाने गाजत आहे. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी कालपासून (2 फेब्रुवारी) सतत भारत-चीनमधील डोकलाम वादाबाबत बोलण्याचा प्रयत्न करत होते. माजी लष्करप्रमुख यांच्या पुस्तकातील काही भाग हा एका मासिकाने प्रकाशित केला होता. ज्याचा संदर्भ देत राहुल गांधी हे देशांतर्गत सुरक्षेबाबत बोलू इच्छित होते. काल त्यांना या विषयावर बोलण्यापासून रोखण्यात आलं. तर आज देखील त्यांना याच विषयावर बोलता येणार नाही असं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं. ज्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी वेलमध्ये उतरून बराच गदारोळ केला. ज्यानंतर विरोधी पक्षातील 9 खासदारांचं निलंबन केलं. ज्यामध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
राहुल गांधींसाठी सत्ताधाऱ्यांना भिडलेल्या महाराष्ट्रातील खासदाराचं निलंबन
राहुल गांधींना बोलू न दिल्याने विरोधकांनी गोंधळ सुरू केला होता. ज्यावेळी काही सदस्यांनी कागदं लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले होते. त्यामुळे सुरुवातील सभागृह हे तासाभरासाठी स्थगित करण्यात आलं होतं. पण नंतर सभागृह सुरू होताच तब्बल 9 खासदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला. जो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. ज्या 9 खासदारांचे निलंबन करण्यात आले त्यात महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांचाही समावेश आहे.
हे ही वाचा>> राहुल गांधींना सलग दुसऱ्या दिवशीही 'त्यावर' बोलू दिलं नाही! लोकसभेतील नेमका गोंधळ काय?
लोकसभेत राहुल गांधींना भारत-चीनच्या सीमारेषेवरील वादावर बोलू दिलं जावं यासाठी काँग्रेस खासदार हे सातत्याने विधानसभा अध्यक्षांकडे मागणी करत होते. मात्र, नियमांचा दाखला देत राहुल गांधींना त्यापासून रोखलं जात होतं. अशावेळी जेव्हा तालिका अध्यक्षांनी राहुल गांधींऐवजी दुसऱ्या सदस्यांची नाव पुकारण्यास सुरुवात केली तेव्हा काँग्रेस खासदार अधिकच आक्रमक झाले. ज्यांनी थेट वेलमध्ये कागदं अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. ज्यामुळे 9 खासदारांचं निलंबन करण्यात आलं.
कोणकोणत्या खासदारांना करण्यात आलं निलंबित?
- अरविंद सिंह
- अमरेंद्र सिंह
- गुरुदीप सिंह ओझोला
- हिबी इडेन
- दीन कुरिया कोत्झी
- प्रशांत पडोळे
- किरणकुमार रेड्डी
- एस. व्यंकटरमण
- मणिकम टागोर
या खासदारांचं उर्वरित संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आलं आहे.
निलंबनानंतर प्रशांत पडोळे नेमकं काय म्हणाले?
'भाजप सरकार जनतेच्या, देशवासियांच्या हितासाठी काहीही करत नाही. आपण अर्थसंकल्पही पाहिला असेल. शेतकरीविरोधी हे सरकार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी यांनी केली पाहिजे, त्यांचे अश्रू पुसले पाहिजे. पण हे सरकार जनतेसाठी काहीही करत नाहीए. बेरोजगारी पण पाहा इथे किती वाढली आहे.जो कोणी जनतेच्या विषयी बोलू इच्छितो त्याचा आवाज दाबण्याचं काम हे करत आहेत.'
हे ही वाचा>> राहुल गांधींना का आणि कशासाठी संसदेत बोलण्यापासून रोखलं? असा विषय तरी काय ज्यामुळे लोकसभेत तुफान राडा?
'आज यांनी निलंबन करून दाखवून दिलं आहे की, जनतेच्या हक्काविषयी जो कोणी प्रश्न उपस्थित करेल त्यांचा आवाज दाबला जाईल.'
'आमचे नेते राहुल गांधी यांनी जो मुद्दा दोन दिवसांपासून मांडण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यांना वारंवार त्यांना रोखलं जात आहे. त्यांना बोलू दिलं जात नाहीए. राहुल गांधींच्या समर्थनार्थ आम्ही नारेबाजी केली. त्यामुळे त्यांनी आमचं निलंबन केलं.'
'असंसदीय विधानं तर ही लोकं वारंवार करतात. काय-काय नाही बोलत हे लोकं तिथे.. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. जनतेच्या हक्कासाठी आम्हाला फासावर दिलं तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत, निलंबन काय मोठी गोष्ट नाही. पण इथे आम्ही आंदोलन करत राहू.. उद्यापासून आम्ही संसदेच्या बाहेर बसून आंदोलन करत राहू आणि जनतेचे प्रश्न मांडत राहू.' अशी प्रतिक्रिया प्रशांत पडोळे यांनी यावेळी दिली.
कोण आहेत प्रशांत पडोळे?
लोकसभेत आज झालेल्या निलंबनानंतर प्रशांत पडोळे हे बरेच चर्चेत आले आहेत. जाणून घेऊया त्यांच्याचविषयी सविस्तर.
प्रशांत पडोळे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत. त्यांनी 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून अत्यंत अनपेक्षितपणे विजय मिळवला होता. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सुनील बाबुराव मेंढे यांचा तब्बल 36,680 मतांनी पराभव केला होता.
ADVERTISEMENT











