भोंदूबाबा अशोक खरातची 'उलटी गिनती' सुरु, EDचा रेटा 11 ठिकाणं आणि गेम ओव्हर!

नाशिकमध्ये अशोक खरातविरोधात एकीकडे न्यायालयात सुनावणी सुरु असताना खरातशी संबंधित 11 ठिकाणी छापेमारी करत ईडीनं कारवाईला सुरुवात केली आहे.

ed launches massive crackdown against fraudster baba ashok kharat game over after raids on 11 locations

भोंदूबाबा अशोक खरातच्या 11 ठिकाणी ईडीची धाड

निलेश झालटे

• 07:00 AM • 14 Apr 2026

follow google news

नाशिक: भोंदू अत्याचारी अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. अशोक खरातभोवती आता ईडीकडून (ED) फास आवळला जात आहे.  सोमवारी ईडीने अशोक खरातशी संबंधित एकूण 11 ठिकाणांवर छापेमारी केली. नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा एकूण 11 ठिकाणी ईडीच्या पथकांनी सर्च ऑपरेशन राबवलं. यातून काय हाती लागलंय? खरातचा पाय आणखी कसा खोलात गेलाय? याचबाबत जाणून घेऊयात.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं?

नाशिकमध्ये खरातविरोधात चौथ्या गुन्ह्यात न्यायालयात सुनावणी सुरु होती आणि इकडे खरातच्या आर्थिक साम्राज्याची पोलखोल ईडीनं सुरु केली होती. न्यायालयाने अशोक खरातला पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का असे विचारले, त्याने नाही सांगितले, या गुन्ह्यात अशोक खरातला 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.. खरात कोठडीत असताना खरातच्या आर्थिक नाड्या तपासण्याचं काम ईडीनं सुरु केलंय.  विशेष म्हणजे, यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता संस्थांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा>> 'माझ्या नावाने बनावट खाते', रुपाली चाकरणकरांच्या बहिणीची 8 तास पोलीस चौकशी, खरातवर केले गंभीर आरोप

EDकडून मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम 17 अंतर्गत अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित इतरांच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांवर छापेमारी केलीय.  नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या FIR चा आधार घेत ईडीनं गुन्हा नोंदवलाय.  या प्रकरणात खंडणी, धार्मिक फसवणूक, औषध देऊन अत्याचार ( अशा गंभीर आरोपांचा समावेश असून, यात महिलांसह निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे.

प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, अशोक खरातनं नाशिक जिल्ह्यातील दोन सहकारी पतसंस्थांमध्ये विविध थर्ड पार्टींच्या नावाने अनेक बँक खाती उघडली होती. मात्र, या सर्व खात्यांचा नॉमिनी तो स्वता आहे. आणि सर्व खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर जोडला आहे..

खरातनं सामान्य वस्तूंना “दैवी उपचारशक्ती” म्हणून विक्री करून लोकांची फसवणूक केली, अशी माहितीही समोर आली होती. पीडितांकडून मिळालेला पैसा आणि खंडणीद्वारे उकळलेली रक्कम खरातनं त्याच्या सीए प्रकाश पोफळे आणि इतरांच्या मदतीने विविध जमिनींमध्ये गुंतवणूक केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

हे ही वाचा>> अशोक खरातचा सीडीआर कोणाकडून मिळाला? विरोधकांच्या आरोपांनंतर अंजली दमानियांचा खुलासा, डोळे पाणावले!

या प्रकरणात अशोक खरात, प्रकाश पोफळे आणि काही नातेवाईकांशी संबंधित निवासी व व्यावसायिक ठिकाणांसह संबंधित सहकारी पतसंस्थांच्या शाखांवरही छापेमारी करण्यात आली आहे.  यात सोमवारी सकाळपासून नाशिकमधील 5, पुण्यातील 3 आणि शिर्डीतील 3 अशा एकूण 11 ठिकाणी PMLA च्या कलम 17 अंतर्गत झडती सुरू केली. 

ईडीनं अत्यंत नियोजन करुन कारवाई केली. नाशिक शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यामध्ये खरातचा 'तृप्तबाला' बंगला आणि समता पतसंस्थेचाही समावेश आहे. अशोक खरातनं समता पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. सोबतच मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिराजवळ असलेल्या ब्रह्मानंद फार्म हाऊसवर देखील ईडीकडून छापेमारी करण्यात आली.  घरातील कागदपत्रे आणि घरासह इतर ठिकाणच्या आर्थिक व्यवहारांचा कसून तपास ईडीनं केला आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ही कारवाई केली जात असल्याची माहिती आहे.

ईडीला बँकेतील व्यवहारांमध्ये काही अनियमितता आढळली आहे का? खरातनं नेमकी किती माया जमवली आहे? खरातच्या आर्थिक गोष्टींमध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे का? किंवा मनी लाँड्रिंगचा काही प्रकार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ईडीच्या तपासात समोर येणार आहेत.