‘जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून..’, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray Facebook Post on Dr Babasahed Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिलीये. यावेळी त्यांनी कर्कश्य डीजेबाबत भाष्य केलंय.

Raj Thackeray Facebook Post

Raj Thackeray Facebook Post

मुंबई तक

14 Apr 2026 (अपडेटेड: 14 Apr 2026, 12:23 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

‘जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून..’

point

बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी राज ठाकरेंची पोस्ट

Raj Thackeray Facebook Post on Dr Babasahed Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज (दि.14 एप्रिल) देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. देशात समता प्रस्थापित करणाऱ्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना देशातील लाखो लोकं आनंदाने नाचताना देखील पाहायला मिळतात. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फेसबुक पोस्ट लिहित डॉ. आंबेडकरांना अभिवादन केलंय. शिवाय, त्यांनी महापुरुषांच्या जयंतीदिवशी लावण्यात येणाऱ्या डीजेविषयी देखील मतं व्यक्त केली आहेत. ते काय म्हणाले जाणून घेऊयात..

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पोस्ट जशीची तशी 

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचं या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. 

पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेंव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलं. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. 

हेही वाचा : थेट पंचायत समिती कार्यालयात घुसली महिला अन् थेट घातला अधिकाऱ्याच्या कॉलरला हात..

स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते. 

छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापूपीसू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू ! 

विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत असताना, या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे ! बाबासाहेबांच्या स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.    

इतर महत्त्वाच्या बातम्या 

गर्लफ्रेंडचं लग्न ठरलं, नाराज प्रियकराने होणाऱ्या नवऱ्याला पाठवले प्रायव्हेट फोटो; पुढे काय घडलं?