Manoj Jarange Patil spoke to minister Uday Samant : अंतरवाली सराटी येथून पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पत्रकार परिषद संपल्यानंतर लगेचच मंत्री उदय सामंत यांचा फोन आल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. या फोनवरील संभाषणात मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाली. काही प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात झाल्याचा मुद्दा जरांगे पाटील यांनी सामंत यांच्यासमोर मांडला. संभाजीनगरमधील काही नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बीडमध्ये अमर अंबोरी यांच्या नोंदीचा उल्लेख करत, नोंद सापडल्यानंतर तिच्यावर एंडोर्समेंट करूनही ती रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यात मराठ्यांच्या नोंदी बोगस असल्याचा गैरसमज पसरू शकतो, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'तू त्याच्यासोबत का बोलतेस?' 17 वर्षीय मैत्रिणीचा घरात घुसून चिरला गळा अन्...
शिंदे यांच्या सांगण्याशिवाय अशा बैठका होऊ शकत नाहीत - जरांगे
या चर्चेदरम्यान जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदे यांच्यासाठी आपण अनेक खस्ता खाल्ल्या असून त्यांच्यावर आपला मोठा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, शिंदे यांच्याशी संबंधित असलेल्या काही नेत्यांच्या भूमिकेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. संभाजीनगरमध्ये एका नेत्याच्या कॉलेजवर आपल्या विरोधात अभ्यासक आणि समन्वयकांच्या बैठका झाल्याचा दावा त्यांनी केला. मराठा समाजाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी या बैठका झाल्याचेही त्यांनी संभाषणात म्हटले. शिंदे यांच्या सांगण्याशिवाय अशा बैठका होऊ शकत नाहीत, असा आपला विश्वास नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. शिंदे साहेब असे करण्यास सांगू शकत नाहीत, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : भागवतांना का ठेवावा लागतोय Gen Z वर डोळे झाकून विश्वास.. 'ही' RSS-भाजपची अगतिकता की स्मार्ट राजकारण?
उदय सामंतांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी
मराठा समाजातील दाखले आणि प्रमाणपत्रे रद्द होण्याच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी उदय सामंतांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. आपल्या मुलांची प्रमाणपत्रे रद्द करून त्यांचे नुकसान करू नका, अशी विनंती त्यांनी केली. चार प्रमाणपत्रे वैध ठरलेली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यासाठी संबंधित चारही प्रमाणपत्रे आणि त्यासंदर्भातील माहिती व्हॉट्सअॅपवर पाठवण्यास त्यांनी सांगितले. यानंतर आपण या प्रकरणाची माहिती घेणार असून दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत याबाबत माहिती देण्याचे उदय सामंत यांनी सांगितल्याचे संभाषणातून स्पष्ट होते. तसेच बावनकुळे आणि विखे पाटील यांच्याशीही आपण बोलणार असल्याचे सामंत यांनी सांगितल्याचे जरांगे पाटील यांनी नमूद केले.
मोडी लिपीतील आणि फारशी भाषेतील जुन्या नोंदी रद्द कशा होतात, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेल्या समितीने शोधलेल्या नोंदी ग्रामपंचायतीला कळवण्यात आल्या आणि त्यानंतर त्या नोंदींमधून संबंधित पुरावे समोर आले, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्याच नोंदी नंतर बोगस असल्याचे सांगून रद्द केल्या जात असल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी बोगस आहेत का, असा थेट सवाल त्यांनी केला. या चारही नोंदी आणि त्यासंबंधीचे व्हिडिओ पाठवण्याची मागणी त्यांनी केली. प्रमाणपत्रे आणि नोंदींची माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः फोन करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितल्याचेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT











