मोठी बातमी! ‘या’ मतदारसंघात ईव्हीएमचं री-काऊंटिंग होणार, जागेवर गेम फिरणार? कोर्टाचा निकाल काय?

मुंबईतल्या चांदिवली विधानसभा निवडणूक वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने ईव्हीएम तपासण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली होती आणि कोर्टानं त्यांचं म्हणणं ऐकून ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिलीये.

EVM Recounting in Maharashtra

EVM Recounting in Maharashtra

निलेश झालटे

• 09:22 PM • 10 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मोठी बातमी! ‘या’ मतदारसंघात ईव्हीएमचं री-काऊंटिंग होणार

point

जागेवर गेम फिरणार? कोर्टाचा निकाल काय?

EVM Recounting in Maharashtra : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएमचं री काऊंटिंग होणार आहे. ते महाराष्ट्रात म्हणजे मुंबईत. मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय जो ऐतिहासिक मानला जातोय, ज्याची चर्चा होतेय. मुंबईतल्या चांदिवली विधानसभा निवडणूक वादाप्रकरणी उच्च न्यायालयाने ईव्हीएम तपासण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान यांनी याबाबत कोर्टात धाव घेतली होती आणि कोर्टानं त्यांचं म्हणणं ऐकून ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिलीय. राहुल गांधींसह अनेक नेते सातत्याने ईव्हीएमवर शंका उपस्थित करत असताना आणि पत्रकार परिषदेतून डेमोसह हल्लाबोल करत असताना या निकालामुळे विरोधकांना मोठा दिलासा मिळालाय असंच म्हणावं लागेल. ही री काऊंटिंग कधी आणि कुठं होणार? नेमकी केस काय होती? कोर्टानं काय दिलाय दिलाय? आणि काय परिणाम होऊ शकतो याबाबतचे हे विश्लेषण.

हे वाचलं का?

नेमकी पार्श्वभूमी काय?

चांदिवली मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे आमदार आहेत दिलीप लांडे. सलग दोन वेळा म्हणजे २०१९ आणि २०२४ ला त्यांनी नसीम खान यांचा पराभव केलाय.  नसीम खान यांचा हा मतदारसंघ बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र २०१९ ला नसीम खान यांचा  ४०९ मतांनी निसटता पराभव झाला तर २४ला मात्र दिलीप लांडे यांनीच २०,६२५ मतांनी खान यांचा पराभव केला.  या निकालाविरोधात नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याचे आरोप केले. न्यायालयाने त्यांचे मुद्दे लक्षात घेत  ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्यास परवानगी दिलीय. ईव्हीएम उत्पादक कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून येत्या १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबईत ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याविषयीचे पत्र मुंबई उपनगर जिल्ह्याचे उप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नसीम खान यांना पाठवलंय.

खान यांनी लांडेंच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देत त्यांना अपात्र ठरवावे आणि स्वतःला विजयी घोषित करावे, अशी मागणी केली होती. कारण, मतमोजणीत ते दुसऱ्या क्रमांकावर होते. याचिकेत खान यांनी अनेक आरोप केले होते. त्यात मतदानाच्या दिवशी दुपारी 3.08 वाजता त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघाला दिलेल्या भेटीचाही उल्लेख होता. शिंदे हे शिवसेनेचे “स्टार प्रचारक” म्हणून नियुक्त होते आणि ही भेट कथितपणे प्रचार आणि रोड शोमध्ये परिवर्तित झाली, ज्यामुळे मतदारांवर परिणाम झाला, असा खान यांचा आरोप होता.

लांडेंनी कोर्टाला सांगितले की, 2019 मधील निवडणुकीतही खान यांनी याच कारणावरुन आव्हान दिले होते, तेव्हा त्यांना केवळ 409 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. फरक एवढाच की, त्यावेळी एकसंध शिवसेनेतून उमेदवारी असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता, अशी माहिती लांडे यांनी दिलेली. न्यायालयाने नुकतीच खान यांची याचिका फेटाळून लावली. मात्र, EVMची तपासणी करण्याच्या त्यांच्या मागणीला मात्र न्यायालयाने मान्यता दिली. न्यायालयाने नमूद केले की, “EVMचे  रँडम परीक्षण करण्याची जी परवानगी यापूर्वीच दिली आहे, ती या निकालामुळे अडथळ्यात येणार नाही.

हे ही वाचा : मला उभा चिरला तरी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही, खासदार फुटणार असल्याच्या बातम्या पाहून अरविंद सावंत संतापले

'माझी मागणी न्यायालयाने मान्य केली'

नसीम खान यांनी यावर “माझी मुख्य मागणी EVM तपासणीची होती आणि न्यायालयाने ती मान्य केली. आता आम्ही त्याच्यातून काय बाहेर येतंय याची वाट पाहू.” असं म्हटलंय. 2024 ची निवडणूक हरल्यानंतर, खान यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मायक्रो-कंट्रोलर, नियंत्रण युनिट, बॅलेट युनिट आणि VVPATमध्ये छेडछाड किंवा फेरबदल झाला आहे का, याची तपासणी व पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती. आता बोरीवलीच्या भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात याची तपासणी केली जाणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी खान यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे मशीनच्या तपासणीसाठी लागणारे 9.4 लाख रुपये शुल्क खान यांनी भरले आहे.

दरम्यान यासंदर्भातील बातम्या माध्यमांमध्ये यायला सुरुवात झाली आणि मग राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरणही आलं. शिवाय त्यांनी यामागची वस्तुस्थितीही सांगितली. त्यांनी म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाने एका न्यायालयीन प्रकरणी दिलेले निर्देश विचारात घेता, मा. भारत निवडणूक आयोगाने, एखाद्या निवडणुकीत दुसन्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या उमेदवाराने अर्जाद्वारे मागणी केल्यास व विहित फी भरल्यास, सदर मतदारसंघात वापरलेल्या एकूण मतदान यंत्रांच्या ५% मयदित Mock Poll किंवा Diagnostic Check या पैकी पर्याय निवडून ईव्हीएम तपासणी (EVM-Check and Verification) करून घेता येईल, असे निर्देश २०२४ व २०२५ मधे दिले आहेत. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अशी मागणी केलेल्या १७ उमेदवारांच्या अर्जाच्या अनुषंगाने त्या त्या मतदार संघातील EVM ची तपासणी प्रक्रिया फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२५ दरम्यान करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 'आई मला माफ कर..' बायकोच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; फेसबुक पोस्टमध्ये बायकोवर गंभीर आरोप

निवडणूक रद्द होणार का?

१६८ - चांदिवली विधानसभा मतदार संघातील उमेदवार नसीम खान यांनी सुद्धा अशाप्रकारे तपासणी करिता विहित रक्कम भरून नोव्हेंबर २०२४ मध्येच अर्ज सादर केला होता. तथापी, त्यांनी मा. उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केलेली असल्याने व निवडणूक याचिका दाखल असलेल्या मतदारसंघात अशी तपासणी प्रक्रिया राबवायची असल्यास त्याकरिता मा. उच्च न्यायालयची परवानगी आवश्यक असल्याने त्यानुसार नसीम खान यांनी न्यायालयात केलेल्या विनंती नुसार, मा. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये १६८- चांदिवली विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये वापरलेल्या ईव्हीएम ची वरील प्रकारे तपासणी करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील १६८ - चांदिवली विधानसभा मतदारसंघातील २० मतदान यंत्राची (EVM-Check and Verification through Diagnostic Check) तपासणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे पहिल्यांदाच ईव्हीएम तपासणी होत आहे या बातमीत तथ्य नाही.

दरम्यान नसीम खान यांच्या आरोपांनंतर आता ही तपासणी होणार आहे. यात जर काही गडबड आढळून आली तर ही निवडणूक रद्द होणार का? लांडे यांची आमदारकी रद्द होणार का? असे अनेक सवाल आहेतच. यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडेही लक्ष लागून आहे.