भागवतांना का ठेवावा लागतोय Gen Z वर डोळे झाकून विश्वास.. 'ही' RSS-भाजपची अगतिकता की स्मार्ट राजकारण?

रोहित गोळे

06 Aug 2026 (अपडेटेड: 06 Aug 2026, 10:13 PM)

देशभरातील Gen Z आंदोलनांनंतर RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी "Gen Z वर माझा डोळे झाकून विश्वास आहे" असे वक्तव्य केले. आता हे विधान भाजपची किंवा RSS ची अगतिकता आहे की, स्मार्ट राजकारण याचं विश्लेषण जाणून घ्या.

Mumbai Tak

RSS आणि भाजपची अगतिकता की स्मार्ट राजकारण? (फाइल फोटो)

Google CTA

बातम्या हायलाइट

point

यापुढे राजकारणातील निर्णायक मतदारवर्ग Gen Z

point

युवकांच्या आंदोलनांनी सरकारला दिला नवा संदेश

point

मोहन भागवतांना का Gen Z ला गोंजारावं लागलं?

मुंबई: देशभरात गेल्या महिन्यांत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक आणि Gen Z पिढीने विविध प्रश्नांवर मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, रोजगार, शिक्षणातील पारदर्शकता आणि सरकारची भूमिका या मुद्द्यांवर तरुणांनी रस्त्यावर उतरून अत्यंत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकासमोर आपल्या मागण्या मांडल्या. ज्यामुळे भाजपचे केंद्रीय मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे तरुण आणि विशेषत: Gen Z ची ताकद काय आहे हे सत्ताधाऱ्यांना जाणवू लागलं आहे. 

हे वाचलं का?

अशावेळी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी "Gen Z वर माझा डोळे झाकून विश्वास आहे" असे वक्तव्य केलं. आता हे  विधान केवळ प्रेरणादायी आहे की, त्यामागे व्यापक राजकीय संदेश आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. याचंचं विश्लेषण आपण जाणून घेऊया.

Gen Z का ठरली राजकारणाचा केंद्रबिंदू?

भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे. पुढील काही वर्षांत कोट्यवधी तरूण प्रथमच मतदान करणार आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षासाठी किंवा वैचारिक संघटनेसाठी हा मतदार वर्ग अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

हे ही वाचा>> 'मी Gen Z वर डोळे बंद करून विश्वास ठेवेन', आंदोलन आणि लाठीचार्जच्या प्रश्नावर मोहन भागवत असं का म्हणाले?

आजची तरुण पिढी ही केवळ प्रचारावर विश्वास ठेवत नाही. तर ते सरकारलाही प्रश्न विचारतात आणि विरोधका देखील. सोशल मीडिया, डिजिटल माध्यमे आणि स्वतंत्र माहितीच्या आधारे स्वत:चं ठाम मत तयार करणारी ही पिढी पारंपरिक मतदारांपेक्षा निश्चितच वेगळ्या जनरेशनची आहे.

आंदोलनांनी बदलले राजकीय गणित

अलीकडील विद्यार्थी आंदोलनांनी एक गोष्ट स्पष्ट केली की, तरुण आता केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आवश्यक वाटल्यास ते संघटितपणे रस्त्यावर उतरतात आणि सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडू शकतात.

हे ही वाचा>> राहुल गांधींनी ‘Gen Z’ साठी केलेलं K-Pop स्टाइल आहे तरी काय? Friendship Day निमित्त खास शुभेच्छा!

यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आणि सामाजिक संघटनांना आता Gen-Z च्या भावना समजून घेण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

मोहन भागवत यांनी नेमका कोणता संदेश दिला?

मोहन भागवत यांनी आज केलेले विधान हे अनेक स्तरांवर महत्त्वाचे मानले जात आहे.

  • तरुणांवर विश्वास असल्याचा सकारात्मक संदेश देणे.
  • आंदोलन करणाऱ्या युवकांना राष्ट्रविरोधी नाही, तर राष्ट्रनिर्मितीतील भागीदार म्हणून पाहण्याचा प्रयत्न.
  • संवाद आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न.
  • तरुणांच्या क्षमतेची सार्वजनिक दखल घेणे.

त्यामुळे मोहन भागवतांचं हे विधान तरुणांशी भावनिक संवाद साधण्याचाही प्रयत्न असू शकतो.

RSS आणि Gen Z: बदलता संवाद?

गेल्या काही वर्षांत RSS आणि विविध सामाजिक संघटनांनी डिजिटल माध्यमांवर आणि तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बदलत्या काळानुसार संवादाची भाषा आणि माध्यमे बदलण्याची गरज आता स्वयंसेवक संघालाही जाणवू लागली आहे.

काही निरिक्षणानुसार, Gen Z ही कोणत्याही एका विचारसरणीशी कायम जोडलेली पिढी नाही. ती मुद्द्यानुसार भूमिका बदलते. त्यामुळे या पिढीशी सातत्याने संवाद ठेवणे ही पक्ष आणि संघटनांची मोठी गरज आहे.

केवळ विश्वास देऊन भागणार नाही...

राजकीयदृष्ट्या मोहन भागवतांनी केलेले विधान महत्त्वाचे असले तरी तरुणांच्या अपेक्षा या केवळ कौतुकाने पूर्ण होणार नाहीत. त्यामुळे काही ठोस कृती या शासनकर्त्यांना कराव्या लागतील.

Gen Z च्या प्रमुख अपेक्षा कोणत्या आहेत?

गुणवत्तापूर्ण रोजगार

पारदर्शक परीक्षा व्यवस्था

शिक्षणातील सुधारणा

स्टार्टअप आणि उद्योजकतेला चालना

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डिजिटल संधी

जर त्यांच्या या मागण्यांवर ठोस आणि योग्य असे धोरणात्मक निर्णय झाले, तरच तरुणांचा शासनकर्त्यांवरील विश्वास वाढीस लागेल.

आगामी निवडणुकांवर होणार परिणाम?

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजकीय पक्षांसाठी आता जात, धर्म किंवा इतर पारंपरिक समीकरणापेक्षा देखील Gen Z मतदारांचे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. कारण आगामी निवडणुकांमध्ये रोजगार, शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि विविध संधी यांसारखे विषय हे कळीचे मुद्दे ठरू शकतात.

त्यामुळे मोहन भागवत यांच्यासारख्या अनेक दशकं राजकारण जवळून पाहिलेल्या सरसंघचालकांचं विधान हे बदलत्या राजकीय वास्तवाची जाणीव करून देणारं निश्चितच आहे.