ADVERTISEMENT
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray and Raj Thackeray MNS alliance announcement, मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळत होते. मात्र, त्यांच्या अधिकृत युतीची घोषणा झाली नव्हती. मात्र, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची निवडणूक आयोगाकाकडून घोषणा करण्यात आल्यानंतर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत युतीची घोषणा कधी होणार? याची तारीख देखील समोर आली आहे. खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आलाया. नेमकं काय ठरलंय? सविस्तर जाणून घेऊयात...
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार असली तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर राज्याचं लक्ष असणार आहे. 74 हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी खास प्लॅन आखलाय. तर दुसरीकडे भाजपने देखील ग्राऊंड लेव्हल पासून नेत्यांची जुळवाजुळव सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसलीये.
हेही वाचा : शेतकऱ्याने कंबोडियाला जाऊन का विकली किडनी? हादरवून टाकणारी कहाणी जशीच्या तशी...
ठाकरे बंधूंच्या अधिकृत युतीची घोषणा कधी होणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येत्या 23 डिसेंबर रोजी आपल्या युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात मंगळवारी (दि.16) झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर पासून सुरू होत असल्याने त्याच दिवशी युतीची घोषणा करण्याचे रणनीतीपूर्वक ठरवण्यात आले आहे. युतीची घोषणा आधी केल्यास उद्धव सेना आणि मनसेमधील तिकीट न मिळालेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता असून, ते महायुतीकडे (भाजप आणि शिंदे गट शिवसेना) वळू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच घोषणा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधू आजपासून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार आहेत. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना 23 डिसेंबरपासून थेट बोलावून एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. महायुतीला अनपेक्षित धक्का देण्यासाठी आणि राजकीय आव्हान उभे करण्यासाठीही ही चाल असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान, मनसेकडून 11 आणि 12 जानेवारी रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे. तर मतदान प्रक्रिया 15 जानेवारी रोजी होणार आहे.
मुंबई महापालिकेतील एकूण सदस्यसंख्या : 227
मुंबईत एकूण 227 वॉर्ड असून त्यापैकी 138 वॉर्डमध्ये मराठी भाषिकांचे वर्चस्व आहे. यामधील 52 वॉर्डमध्ये मराठी मतदारांचे प्रमाण 51 ते 84 टक्क्यांच्या दरम्यान आहे. तर 23 ते 35 टक्के मराठी लोकसंख्या असलेले 25 वॉर्ड आहेत. याशिवाय 47 वॉर्डमध्ये मुस्लीम समाजाचे प्राबल्य दिसून येते. 28 वॉर्डमध्ये गुजराती-राजस्थानी समाजाचा प्रभाव असून सुमारे 10 टक्के वॉर्डमध्ये उत्तर भारतीय समाज बहुसंख्य आहे. मात्र, समाजिक समीकरणे वेगळी असली तरी अनेकदा मराठी मतदारांनी गुजराती उमेदवारांना, तर मुस्लीम मतदारांनी मराठी उमेदवारांना निवडून दिल्याची उदाहरणे आहेत. तरीसुद्धा, यावेळी मराठी भाषिकांवर होत असल्याचा अन्याय हा मुद्दा निवडणूक अधिक चुरशीची ठरवू शकतो.
सध्याच्या स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी मुंबईतील सर्व 227 जागा खुल्या असल्याचे मानले जाते. जर दोघांनाही खरोखरच महापालिकेतील सत्ता मिळवायची असेल, तर त्यांच्या आजूबाजूच्या नेत्यांनी तिकीट वाटपाच्या काळात भाजप-शिंदेसेना यांच्याशी गुप्त समझोता करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
देवेंद्र फडणवीसांच्या सभेआधी भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, अंबरनाथमध्ये भीतीचं वातावरण
ADVERTISEMENT











