देवेंद्र फडणवीसांच्या सभेआधी भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार, अंबरनाथमध्ये भीतीचं वातावरण
अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. भाजप पक्षाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
देवेंद्र फडणवीसांच्या सभेआधी भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
अंबरनाथ येथील धक्कादायक घटना
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. भाजप पक्षाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. काही अज्ञान व्यक्तींनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा गोळीबार केल्याची माहिती आहे.
कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड फायर
संबंधित घटना काल म्हणजेच बुधवारी जवळपास 1 वाजताच्या सुमारास घडली. रात्री उशीरा पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडी पाडा परिसरातील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बसले होते. त्यावेळी, दोन अज्ञात आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने चार राऊंड फायर केले. या गोळ्या थेट कार्यालयाच्या काचेवर लागल्या. तसेच, गोळीबाराचा आवाज ऐकून कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आले आणि हल्लेखोरांनी त्याच्या दिशेनेही गोळ्या झाडल्या. त्यावेळी, एका सुरक्षारक्षकाच्या बोटावर गोळी लागल्यामुळे तो जखमी झाल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: शेतकऱ्याने कंबोडियाला जाऊन का विकली किडनी? हादरवून टाकणारी कहाणी जशीच्या तशी...
पोलीस घटनास्थळी दाखल
ही संपूर्ण घटना कार्यालयात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. प्राथमिक तपासातून हा गोळीबार दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ आणि बदलापूर पोलीस तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
हे ही वाचा: एक कोटींचा विमा आणि Murder.. एक चूक; चिकन आणि देशी दारु! लातूर मर्डरची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी धक्कादायक घटना
आज अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून त्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेने निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. रात्री उशीरा घडलेल्या या भयानक घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.










