एक कोटींचा विमा आणि Murder.. एक चूक; चिकन आणि देशी दारु! लातूर मर्डरची A to Z स्टोरी
कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने एक अत्यंत भयंकर कृत्य केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

लातूरः लातूरचा एक तरुण. मुंबईत फ्लॅट घेतला. ५७ लाखांचं कर्ज. हफ्ते थकायला लागले, हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्या डोक्यात अचानक एक आयडिया येते. तो एका व्यक्तीला लिफ्ट देतो आणि गाडीसह त्या माणसाला जाळून टाकतो. मग खरा प्लॅन सुरु होतो. हा प्लॅन असतो टर्म इंशोरन्सचे एक कोटी रुपये मिळवण्याचा. मात्र एक चूक होते, पोलिसांना संशय येतो आणि २४ तासातच या पठ्ट्याचा करेक्ट कार्यक्रम होतो. लातूरमधील ही घटनाय. ५० वर्षीय व्यक्तीचा मर्डर झालाय आणि जो तरुण दिसतोय तो आरोपी आहे. त्याचं नाव आहे गणेश चव्हाण. तर हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गोविंद यादव. ही स्टोरी फारच रंजक आहे, म्हणजे एखाद्या सिनेमासारखी. ही ए टू झेड स्टोरी आपण जाणून घेऊया.
लातूर मर्डरची संपूर्ण कहाणी
घटना काय घडली आणि कशी समोर आली ते बघा. 14 डिसेंबरच्या रात्री साडेबाराला 112 हेल्पलाईनवर एक कॉल येतो. वानवडा पाटी ते वानवडा जाणारे रोडवर एका गाडीला आग लागल्याची माहिती मिळते. पोलिस आणि अग्निशमन दल तिथं पोहोचतात. आग विझवतात, गाडीमध्ये एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या स्थितीत दिसून येतो. तपास सुरु होतो. सांगाडयाचा पोस्टमार्टम जागीच वैदयकिय अधिकारी बोलावुन डी.एन.ए. सॅम्पल काढून ठेवले जातात. गाडी नंबरवरुन मालकाचा शोध घेतला जातो. ही गाडी बळीराम राठोड यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न होतं. ही गाडी त्यांचा मेव्हणा गणेश चव्हाण हा वापरत असल्याची माहिती समोर येते. मग गणेशचा शोध पोलिस घेतात. रात्री दहाच्या सुमारास मित्राला लॅपटॉप देण्याचे कारणाने बाहेर गेला असल्याचं त्याची पत्नी सांगते.
मग रडारड सुरु होते. घटनास्थळावर जळालेल्या गाडीतुन प्राप्त झालेल्या हातातल्या कड्यावरुन सदरचा मयत हाडाचा सांगाडा हा गणेश चव्हाण याचा असल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात. मग हा मृतदेह गणेशच्या नातेवाईकांच्या ताब्यातही दिला जातो.










